Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : हरियाणात जे घडलं तेच महाराष्ट्रात घडणार; नऊ वाजताच्या भोंग्याला...

Devendra Fadnavis : हरियाणात जे घडलं तेच महाराष्ट्रात घडणार; नऊ वाजताच्या भोंग्याला विचारतो, आता कसं वाटतय?

मुंबई : हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. हरियाणात जे घडलं तेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात घडणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी केले. हरियाणातील विजयाबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयोत्सवात फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय आदी या प्रसंगी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष जिंकला हे महत्वाचे नसून तेथील निवडणुकीमुळे जम्मू – काश्मीरबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर खोटा प्रचार करणाऱ्या पाकिस्तानला जोरदार चपराक बसली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा भारतीय जनता पार्टीला फटका बसला. अशा खोट्या प्रचाराला तशाच पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पहिली परीक्षा हरियाणा, जम्मू – काश्मीर मध्ये होती. या परीक्षेत मतदारांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला स्पष्टपणे नाकारून नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला साथ दिली आहे. हरियाणामध्ये अग्नीवीर योजनेविरोधात अपप्रचार झाला. खेळाडूंना पुढे करून रान पेटविण्यात आले. वेगवेगळया समाज घटकांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले गेले. मतदारांनी हा खोटा प्रचार नाकारत मागील निवडणुकीपेक्षा भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळवून दिले. विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना हरियाणाच्या जनतेने पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. जम्मू काश्मीर मध्ये भारताचा, लोकशाहीचा विजय झाला आहे, असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले की, ३७० वे कलम रद्द झाल्यानंतर तेथे रक्ताचे पाट वाहतील असे म्हणणाऱ्यांना तेथील जनतेने उत्तर दिले आहे. काश्मीरच्या जनतेवर भारतात अन्याय होतो आहे, असा प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्या पाकिस्तानला काश्मीरच्या जनतेने चपराक लगावली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा सारखाच विजय मिळविण्याचा निर्धार केला पाहिजे.

”नऊ वाजताच्या भोंग्याला विचारतो, आता कसं वाटतय?

हरियाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने महाराष्ट्रातील महविकास आघाडीच्या नेत्यांनी आज काय बोलायचे याची तयारी करून ठेवली होती. या नेत्यांना, सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याला आता मला विचारायचं आहे की, आता कसं वाटतंय? असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -