नितेश राणे यांचा शरद पवारांसह तुतारी पक्षावर घणाघात
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) आणि तुतारीचे (Tutari) अन्य नेतेमंडळींच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये काल तुतारीच्या व्यासपीठावरुन जानकर नावाच्या कार्ट्याने ‘गणपती बाप्पा दारु पितात’ अशा घाणेरड्या शब्दांमध्ये देवी-देवतांचं अपमान केलं. म्हणजेच तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर आहे का? कारण, मुस्लिम लीग ज्या पद्धतीने हिंदूंचा द्वेष करतात, ज्या पद्धतीने हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात तशीच भूमिका वारंवार तुतारीच्या व्यासपीठावरुन घेताना दिसून येते, असा घणाघात भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
त्याचबरोबर मोहम्मद पैगंबराबद्दल कोणी काही बोलले तर सर्वांना मिरच्या लागतात. अशावेळी सर्वांकडून धमक्यांची भाषा केली जाते. परंतु व्यासपीठावर एखाद्या नालायकाने ‘दिड दिवसाचा गणपती दारु पितो’ अशा वक्तव्यावर शरद पवार कुठलाही आक्षेप न घेता केवळ हसत असतील. तर त्यांच्या नजरेसमोर देवी-देवतांचं अपमान करणं हाच तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा अजेंडा आहे का? असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केला.
‘हिंदूंचे खरे विरोधक हे मुसलमान नाहीत तर हिंदूच आहेत’ असे वाक्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय सुंदरतेने म्हटले होते. या वाक्याची आठवण पवार साहेब त्यांच्या व्यासपीठावरून वारंवार करुन देत आहेत. याआधी देखील शरद पवार हे व्यासपीठावर उपस्थित असताना त्याच व्यासपीठावरुन ज्ञानेश्वर महाराव नावाच्या कार्ट्याने हिंदू देवी-देवतांचा अपमान केला. देवांसाठी घाणेरडे शब्द वापरल्याचा गलिच्छ प्रकार घडला होता. असाच प्रकार काल इंदापूरमध्ये घडला. दोन्ही ठिकाणी पवारांच्या समोरच देवी देवतांची विडंबना झाल्याने पवारच हिंदूंविरोधी असल्याचे दिसून येते.