प्रा. जयसिंग यादव
पृथ्वीला सर्वात जवळचा असलेल्या तसेच पाणी, महासागर, पर्वतासह पृथ्वीसारखे वातावरण असलेल्या शुक्राचा शोध घेण्याची स्पर्धा जगातील अनेक देशांमध्ये लागली आहे. शुक्राला पृथ्वीचा भाऊ मानले जाते. सूर्य, चंद्र आणि मंगळावरच्या मोहिमेनंतर आता भारताने आपला मोर्चा शुक्राकडे वळवला आहे. शुक्र ग्रहावरील संशोधनाला किती महत्त्व आहे, तिथे जाण्यात कोणती आव्हाने आहेत, हे जाणून घेताना समोर येणारी रंजक माहिती.
मंगळयान आणि चांद्रयानच्या यशानंतर, ‘इस्रो’ने आता ‘व्हीनस ऑर्बिटर मिशन’ची तयारी सुरू केली आहे. त्याला शुक्रयान असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाने अलीकडेच ‘मिशन शुक्रयान’ला मंजुरी दिली. आता ‘इस्रो’ पृथ्वीजवळील शुक्र ग्रहाचा अभ्यास करेल. या मोहिमेसाठी एक विशेष अंतराळ यान तयार केले जाईल. शुक्रयान हे एक ‘ऑर्बिटर मिशन’ आहे. याचा अर्थ हे यान शुक्र ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालताना अभ्यास करेल. हे वैज्ञानिक पेलोड्स वाहून नेईल. हे ‘हाय रिझोल्यूशन सिंथेटिक अपर्चर रडार’ आणि ‘ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार’ आहेत. शुक्रयान अवकाशातून शुक्राची भौगोलिक रचना आणि ज्वालामुखीच्या हालचालींचा अभ्यास करेल. ते ग्रहावरील भूगर्भातील वायू उत्सर्जन, वाऱ्याचा वेग, ढग आणि इतर गोष्टींचा अभ्यास करेल. ‘इस्रो’चे हे मिशन चार वर्षांचे असेल. शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. सूर्यमालेतील हा पहिला ग्रह मानला जातो, जिथे जीवन होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तो अगदी पृथ्वीसारखा दिसतो. त्याचा आकारही पृथ्वीसारखा आहे. तिथेही एक महासागर होता आणि हवामान पृथ्वीसारखे होते; पण आता शुक्र राहण्यायोग्य नाही. शुक्राचे तापमान ९०० अंश फॅरेनहाइट म्हणजेच ४७५ अंश सेल्सिअस आहे. या तापमानात काचदेखील वितळू शकते. येथील वातावरण अत्यंत विषारी आणि कार्बन डायऑक्साइडने भरलेले आहे. सल्फ्युरिक ॲसिडच्या पिवळ्या ढगांनी वेढलेले आहे. शुक्राच्या वातावरणाची घनता पृथ्वीपेक्षा ५० पट जास्त आहे. हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. शुक्राचा अभ्यास पृथ्वीवरील जीवनाचा संभाव्य नाश वाचवू शकतो. शुक्रयान-१ ला ‘व्हीनस ऑर्बिटर मिशन’ म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्र ग्रहावर प्रस्तावित केलेले पहिले मिशन आहे.
या मोहिमेअंतर्गत २५०० किलो वजनाचे अंतराळयान शुक्राची प्रदक्षिणा करेल आणि या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रहाच्या पृष्ठभागाखाली आणि सल्फ्युरिक ॲसिडने भरलेल्या ढगांमध्ये लपलेले रहस्य शोधून काढेल. हे मिशन ‘जीएसएलव्ही एम के २’ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. शुक्रयान-१चा प्राथमिक उद्देश शुक्राचा सर्वसमावेशक अभ्यास करणे आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे विश्लेषण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. याद्वारे शास्त्रज्ञ हवामान, धूप आणि इतर भूवैज्ञानिक घटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. शुक्राच्या भूगर्भीय रचनेचा आतापर्यंत फारसा अभ्यास झालेला नाही. या मोहिमेद्वारे त्यावर सविस्तर अभ्यास केला जाणार असून त्यातून या ग्रहाच्या भूवैज्ञानिक इतिहासाची महत्त्वाची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय सौर किरणोत्सर्ग आणि पृष्ठभागावरील कण यांच्यातील संबंधांचीही सखोल चौकशी केली जाईल. शुक्रयान-१ हे केवळ भारतासाठीच नाही, तर जागतिक वैज्ञानिक समुदायासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. या मिशनमुळे शास्त्रज्ञांना शुक्र ग्रह अब्जावधी वर्षांपूर्वी कसा विकसित झाला, हे समजण्यास मदत होईल. अलीकडील शोधांमध्ये शुक्राच्या ढगांमध्ये फॉस्फिनचे अस्तित्व आढळले. ते सूक्ष्मजीव जीवनाचे संभाव्य लक्षण असू शकते. हा शोध पृथ्वीच्या पलीकडे जीवनाच्या शक्यतेबद्दल वैज्ञानिकांमध्ये नवीन आशा आणि कुतूहल वाढवत आहे. शुक्रयान १ मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी ‘इस्रो’ डिसेंबर २०२४ ला लक्ष्य करत आहे. शुक्रयान १ हे ‘व्हीनस मिशन’ म्हणूनही ओळखले जाते. या मोहिमेत शुक्राची भूगर्भीय आणि ज्वालामुखीय क्रिया, वाऱ्याचा वेग आणि इतर ग्रहांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जाईल. शुक्रावरील वातावरण अत्यंत उष्ण आणि विषारी असल्याने या मोहिमेमुळे पृथ्वीसारखे ग्रह कसे विकसित होतात आणि पृथ्वीच्या आकाराच्या एक्सोप्लॅनेटवर काय परिस्थिती असू शकते हे समजून घेण्यास मदत होईल. शुक्रयान-१ मिशन पृथ्वीच्या हवामानाचे मॉडेलिंग करण्यासही मदत करेल. त्यामुळे शास्त्रज्ञांना भविष्यातील हवामान परिस्थितीचा अंदाज लावता येईल. शुक्रयान-१ ही मोहीम ‘इस्रो’साठी एक महत्त्वाची आणि आव्हानात्मक पायरी आहे. हे मिशन भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला केवळ नवीन उंचीवर घेऊन जाणार नाही तर जागतिक वैज्ञानिक समुदायाला महत्त्वपूर्ण माहिती देखील प्रदान करेल. शुक्र आपल्या ग्रहाच्या जवळ आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास नवी माहिती देईल. ‘व्हिनस मिशन’मध्ये एक विशेष अंतराळयान तयार केले जाईल; जे केवळ त्याच्या अभ्यासासाठी शुक्राभोवती फिरेल. त्यामुळे शुक्राचा पृष्ठभाग, उपपृष्ठभाग, वातावरण, सूर्याचा प्रभाव इत्यादी समजू शकेल. असे म्हटले जाते की, एके काळी शुक्र हा राहण्यायोग्य ग्रह होता; पण नंतर तो बदलला. या बदलाचाही अभ्यास केला जाणार आहे.
मार्च २०२८ मध्ये हे मिशन सुरू होईल, असे मानले जात आहे. कारण त्या वेळी शुक्र पृथ्वीच्या जवळ असेल. या मोहिमेसाठी शासनाने १२३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ८२४ कोटी रुपये फक्त यानावर खर्च केले जाणार आहेत. गेल्या वर्षी ‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले होते की, शुक्राचे वातावरण आणि त्याचे आम्लीय वर्तन समजून घेण्यासाठी तेथे मशीन पाठवणे आवश्यक आहे. जेणेकरून तेथील वातावरणाच्या दाबाचा अभ्यास करता येईल. शुक्राचा वायुमंडलीय दाब पृथ्वीपेक्षा शंभरपट जास्त आहे. सूर्यमालेच्या उत्पत्तीविषयी माहिती मिळवण्यासाठी शुक्राचा अभ्यास आवश्यक आहे. शुक्र आणि मंगळ ग्रहांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्याला तेथे जीवन का नाही, हे कळेल. हे अधिक खोलवर समजून घेण्यासाठी तेथे मिशन पाठवणे आवश्यक आहे. शुक्रयान हे ‘ऑर्बिटर मिशन’ आहे. म्हणजेच अंतराळयान शुक्र ग्रहाभोवती फिरताना त्याचा अभ्यास करेल. त्यात अनेक वैज्ञानिक पेलोड असतील. शुक्रयानाद्वारे अवकाशातून शुक्राची भौगोलिक रचना आणि ज्वालामुखीच्या हालचालींचा अभ्यास करण्यात येणार आहे. शुक्र ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत शुक्राभोवती फिरेल. शुक्रयान मोहिमेचे आयुष्य चार वर्षांचे असेल. म्हणजे या कालावधीसाठी अवकाशयान बनवले जाईल. शुक्रयानाचे वजन २५०० किलो असेल. यात १०० किलो वजनाचे पेलोड असतील. यामध्ये सध्या, १८ पेलोड्स तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि, किती पेलोड तैनात केले जातील हे नंतर ठरवले जाईल. त्यात जर्मनी, स्वीडन, फ्रान्स आणि रशियाचे पेलोड्सही बसवता येतील. चांद्रयानाप्रमाणेच ‘इस्रो’ची ही मोहीमही खूप खास असणार आहे. शुक्र आपले स्वरूप बदलण्याच्या मूळ कारणांचा अभ्यास केल्यास शुक्र आणि पृथ्वी या दोन्ही ग्रहांची उत्क्रांती समजून घेण्यास खूप मदत होईल. या मोहिमेसाठी अंतराळयानाच्या विकासाची आणि प्रक्षेपणाची जबाबदारीही ‘इस्रो’वर आहे. अशा अंतराळयान आणि प्रक्षेपण वाहनांच्या विकासादरम्यान भारतीय उद्योगाचा लक्षणीय सहभाग असेल. मिशन शुक्रयान शास्त्रज्ञांना ग्रहांचे वातावरण सारखेच सुरू झाले असले, तरी ते वेगळ्या पद्धतीने कसे विकसित झाले, हे समजून घेण्यास मदत करेल. या मोहिमेंतर्गत शुक्रावरील माती पृथ्वीवर आणण्याची योजना आहे. याद्वारे शास्त्रज्ञांना या मोहिमेअंतर्गत शुक्राचा पृष्ठभाग, भूपृष्ठ आणि वातावरणातील प्रक्रियांचा अभ्यासही करता येणार आहे. सूर्याचा शुक्राच्या वातावरणावर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास या मोहिमेत करण्यात येणार आहे. शुक्रावरून मिळालेला डाटा वैज्ञानिक समुदायाशी शेअर करण्याचीही योजना आहे. हा डाटा विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना प्रशिक्षणाची संधीदेखील प्रदान करेल. या मोहिमेमुळे भविष्यातील ग्रहांच्या शोधाचा मार्गही मोकळा होईल.