Wednesday, April 23, 2025
Homeदेशहरियाणात भाजपाची हॅटट्रीक! जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला १० वर्षांनंतर स्पष्ट बहुमत

हरियाणात भाजपाची हॅटट्रीक! जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला १० वर्षांनंतर स्पष्ट बहुमत

नवी दिल्ली : हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपने सत्ता मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. ९० जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजपने बहुमताचा ४६ चा आकडा पार करत ४९ जागा मिळवल्या आहेत. तर काँग्रेसला ३६ जागांपर्यंत मजल मारता आली. सायंकाळी ५ वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या ट्रेंडनुसार, भाजपने ३६ जागा जिंकल्या असून त्यांनी १३ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या असून ५ जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. अपक्षांनी ३ जागा मिळवल्या आहेत. दरम्यान, नायब सिंह सैनी हरियाणाचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

हरियाणात काँग्रेस सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असे विविध एक्झिट पोलने वर्तवलेले भाकीत फोल ठरले. भाजपने हॅट्ट्रिक करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. लोकसभा निवडणुकीनंतर दोन राष्ट्रीय पक्षांमधील ही निवडणूक पहिली मोठी लढत झाली. महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये या निकालाचा मोठा प्रभाव पडू शकतो.

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांची मतमोजणी मंगळवारी पार पडली. कुस्तीपटूंचे आंदोलन, शेतकरी आंदोलन यामुळे हरियाणात दहा वर्षांच्या सत्तेनंतर पुन्हा भाजपला सत्ता राखणे आव्हानात्मक होते. तरीही भाजपने सलग तिस-यांदा सत्ता मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते. तर काँग्रेसने पुनरागमन करण्याचा निर्धार केला होता. सुरूवातीचे काही तास मतमोजणीचा कल काँग्रेसच्या बाजूने होता. काँग्रेसने ४८ जागांवर तर भाजपने १६ जागांवर आघाडी घेतली होती. काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे चित्र असताना दोन तासानंतर मतमोजणीला वेगळे वळण मिळाले. भाजपने ४२ जागांवर आघाडी घेतल्याने काँग्रेसची पिछेहाट झाली. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर झाली. दुपारनंतर निकालाचे पूर्ण चित्र स्पष्ट झाले होते.

भाजपची हरियाणातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

२०२४ चे निकाल भाजपची हरियाणातील सर्वोत्तम कामगिरी आहे. १९८० मध्ये स्थापनेनंतर केवळ दोन वर्षांनी भाजपने हरियाणात निवडणूक लढवली होती. १९८२ च्या निवडणुकीत भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. भाजपने १९८७ मध्ये १६, १९९६ मध्ये ११, २००० मध्ये ६ आणि २००५ मध्ये दोन जागा जिंकल्या. २००९ मध्येही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि केवळ चार जागा जिंकता आल्या. हरियाणा निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी २०१४ च्या निवडणुकीत झाली होती, जेव्हा भाजपने ३३.३ टक्के मतांसह ४७ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. परंतु जागा कमी झाल्या आणि पक्षाला ३६.७ टक्के मतांसह केवळ ४० जागा जिंकता आल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -