हरियाणा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचे (Haryana Elections Result) निकाल आज जाहीर झाले. त्यानुसार, भाजपा हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (Naib Singh Saini) यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पाच मंत्र्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हरियाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता (Gyan Chand Gupta) यांना पंचकुला मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे चंद्रमोहन येथून विजयी झाले आहेत. चंद्रमोहन माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे पुत्र आहेत.
दुसरीकडे मंत्री संजय सिंह नूह विधानसभा मतदारसंघातून हरले आहेत. नूह विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आफताब अहमद विजयी झाले आहेत.
तर जगाधरीमधून माजी मंत्री कंवरपाल गुर्जर यांचा देखील पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार चौधरी अक्रम खान विजयी झाले आहेत.
माजी आरोग्य मंत्री डॉ कमल गुप्ता हिसार मतदारसंघातून निवडणूक पराभूत झाले आहेत. येथे अपक्ष उमेदवार आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल विजयी झाल्या आहेत.
दुसरीकडे माजी मंत्री सुभाष सुधा यांचा ठाणेसर मतदारसंघातून पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अशोक अरोरा विजयी झाले आहेत.
तर रानिया मतदारसंघातून माजी मंत्री रणजीत चौटाला देखील पराभूत झाले आहेत. या मतदारसंघात INLD-BSP युतीचे उमेदवार अर्जुन चौटाला विजयी झाले आहेत.
दरम्यान, भाजपाने (BJP) ४९ जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) ३७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा हरियाणामध्ये सरकार स्थापन करणार हे निश्चित झाले आहे.