पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांकडून दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टीफिशियल इंटलिजन्स) वापर करण्यात येणार आहे.
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटामार्गे गेलेल्या मोबाइल वापरकर्ते, त्यांचे नाव, पत्ते याबाबतच्या माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
बोपदेव घाट परिसरात तरुणी मित्रासमवेत फिरण्यास गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबूने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला शर्ट आणि बेल्टने बांधून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह तपास पथकांकडून आरोपींचा माग घेण्यात आहे.
या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. तसेच, दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात येत असल्याची पोलिसांकडून देण्यात दिली.आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. पोलिसांच्या श्वान पथकाने घटनास्थळाचा शोध घेतला. त्याठिकाणी आरोपींनी तरुणाला मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले.