पुणे : आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. त्यामध्ये चॅनलवाल्यांकडून भर घातली जाते. हा नेता काय बोलला आणि तो नेता काय बोलला! यावरच ते प्रतिक्रिया घेतात. आज राजकारण्यांची भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. त्यांना बोलू शकतात, त्यांना वठणीवर आणू शकतात. त्यामुळे साहित्यिकांनी आपला मराठी बाणा दाखवून राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडे बोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले. यावेळी त्यांनी आजच्या साहित्यिक आणि कवींवर नाराजी व्यक्त करत राजकारण्यांवरही टीका केली.
दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) सकाळी झाले. याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहदचे संजय नहार, साहित्य महामंडळाचे प्रकाश पागे, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, राजकारण्यांचे कान धरून, त्यांना समजावून सांगण्याचे कर्तव्य साहित्यिकांचे आहे. आज महाराष्ट्राची सर्कस झालीय. कोणी विदुषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारतंय. खरंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे लोक आहेत, त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत. पण ज्या प्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय, कशाला काही धरबंद नाही, अशा गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. तिथं त्यांचे कान धरून शिकवणं, समजावणं हे तुमचं सर्वांत मोठं कर्तव्य आहे, असं मी मानतो.
तुम्ही अधिकारवाणीनं सांगू शकता, मग आम्ही बोललं तर ट्रोल केले जाते, असं तुम्ही म्हणाल. पण तुम्ही त्याचा विचार करू नका. मला पण ट्रोल केले जाते, मी ते पाहत नाही, वाचत नाही. आपण आपले काम करावे.