बुटीबोरीतील अवाडा प्रकल्पाचे भूमिपूजन; १३ हजार ६५० कोटींची गुंतवणूक, ५ हजार युवकांना मिळणार रोजगार
नागपूर : सौर ऊर्जेसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य व उपकरणांची निर्मिती अवाडा कंपनीतील नागपूरच्या नियोजित प्रकल्पात होणार आहेत. महाराष्ट्राने कायम ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर विशेष भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे २०३० सालापर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून ५० टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे व्यक्त केला.
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या एकात्मिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अवाडा कंपनीचे अध्यक्ष विनीत मित्तल, सुरेश सोनी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राज्यात 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे काम सुरू केले आहे. ही देशातील सर्वात मोठी सौरऊर्जा निर्मितीची योजना आहे. अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रात 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे नियोजन सुरू आहे. आणखी 4 हजार मेगावॅटचे काम प्रगतिपथावर आहे. अवघ्या अडीच वर्षांत सुमारे 20 हजार मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले असून त्यांचे काम सुरू केले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
अवाडाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 13 हजार 650 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच 5 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 51 टक्के महिला कामगारांचा समावेश या कंपनीत करण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राने ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचे धोरण तयार केले. या धोरणाचा राज्याला फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बुटीबोरी येथे साकारणार आशिया खंडातील सर्वात मोठा डिस्टिलरी प्रकल्प
विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरीच्या माध्यमातून केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नव्हे तर कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून विदर्भासह मराठवाड्यातील सुमारे नव्वद हजार शेतकऱ्यांच्या जीवनात पीक पध्दतीच्या बदलातून परिवर्तन साध्य होणार असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बुटीबोरी येथे पर्नोड रिकार्ड इंडियाच्या माल्ट डिस्टिलरीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शेतीला अधिक शाश्वत व फायदेशिर केल्याशिवाय शेतकऱ्यांना अधिक आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. हे लक्षात घेऊन पारंपरिक पीक पध्दतीत बदल करुन नवीन फायदेशिर पिकांचे वाण त्यांच्या पर्यंत पोहचले पाहिजेत. शिवाय याला औद्योगिकरणाची, प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली पाहिजे. कृषी विभाग यासाठी प्रयत्नशिल आहे.
या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून बार्ली उत्पादक शेतकऱ्यांना आपला कच्चा मालासाठी हक्काची बाजारपेठ मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बार्ली पिकाच्या संदर्भात एक मूल्यवर्धित साखळी निर्माण व्हावी, शेतकऱ्यांनी यातून अधिक लाभ मिळावा याच बरोबर वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी लवकरच कृषी विभाग व पर्नोड रिकार्ड इंडिया यांच्यातही सामंजस्य करार करण्यात येईल, असे ते म्हणाले.