नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या बदल्यात जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांचे मुलगे तेज प्रताप यादव, तेजस्वी यादव यांना दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
आरजेडीच्या खासदार मीसा भारती यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले, आमचा उच्च न्यायालयावर विश्वास आहे आणि आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहे. आरजेडी नेते लालू प्रसाद यादव, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांचे पासपोर्ट आधीच याच न्यायालयात जमा केलेले असल्याने, या विशिष्ट प्रकरणात पासपोर्ट जमा करण्याची गरज नाही. या प्रकरणी कागदपत्रांच्या छाननीसाठी २५ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे.