वेंधळा कावळा...

कथा - रमेश तांबे


राधा अभ्यासाच्या खोलीत एकटीच बसली होती. पण ती अभ्यास करीत नव्हती. ती कसल्या तरी विचारात पडली होती. तेवढ्यात खिडकीत एक कावळा येऊन बसला. राधाला असे काळजीत पडलेलं बघून तो म्हणाला,
राधाताई राधाताई
विचार कसला करता
मला तरी सांगा जरा
कसली तुम्हाला चिंता!


कावळ्याचे बोलणे ऐकून राधा म्हणाली, “अरे कावळ्या तू जा बघ इथून! मला उगाच त्रास देऊ नकोस. एक तर उद्या माझी परीक्षा आहे आणि माझी वही राहिली आहे मैत्रिणीच्या घरी. आता ती कोण आणि कशी आणणार? याची चिंता मला आहे.” राधाचे बोलणे संपताच कावळा म्हणाला, “अगं राधाताई कुठे राहाते तुझी मैत्रीण, सांग मला पत्ता, वही घेऊन येतो आत्ता!” कावळ्याचे बोलणे ऐकून राधाला बरे वाटले. ती कावळ्याला म्हणाली, “खरंच आणशील का तू वही?” कावळा म्हणाला, “हो हो आता घेऊन येतो.” मग राधा म्हणाली, कावळ्या ऐक माझ्या मैत्रिणीचा पत्ता नीट...


गावाच्या मध्यभागी दोन देवळं न्यारी
सोनेरी चंदेरी कळस त्यांचे भारी
खिडकीतून दिसतो सोनेरी कळस
अंगणात तिच्या आहे मोठी तुळस!


राधाचे बोलणे संपायच्या आतच कावळा उडाला अन् म्हणाला, “आता आणतो वही बघ.” मग कावळा गेला उडत उडत. “देवळं आणि कळस” असे बडबडत. राधाच्या गावात देवळे भरपूर होती. कावळा “दोन” हा शब्द गेला विसरून आणि मैत्रिणीचे घर शोधताना गेला दमून. मग कावळा आला परत राधाकडे आणि म्हणाला, “राधाताई मला सांग ना पत्ता परत, लगेच घेऊन येतो वही उडत.” राधा म्हणाली,


गावाच्या मध्यभागी दोन देवळं न्यारी
सोनेरी चंदेरी कळस त्यांचे भारी
खिडकीतून दिसतो सोन्याचा कळस
अंगणात तिच्या आहे मोठी तुळस!


पुन्हा पत्ता नीट न ऐकताच कावळा उडाला. राधा म्हणाली, “अरे कावळ्या नीट ऐक तरी जरा!” पण कावळा कसला थांबतोय. तो गेला उडत “दोन देवळे, दोन कळस” असे म्हणत. आता कावळा बरोबर गावाच्या मध्यभागी पोहोचला. तिथे होती दोन देवळं आणि दोन कळसं! पण मैत्रिणीचे घर नेमके कुठे त्याला कळेना. मग कावळा पुन्हा आला. आता मात्र राधा वैतागली आणि म्हणाली, “अरे वेंंधळ्या,” “सोनेरी कळस अंगणात तुळस.” मग कावळा पुन्हा म्हणत निघाला. गावाच्या मध्यभागी पोहोचला. दोन देवळं दोन कळस होते. पण सोनेरी कळस आणि अंगणात... अंगणात...? तुळस शब्द विसरला. आंबा, फणस... असे काही आठवत राहिला. कावळ्याला कळेना. तो पुन्हा राधाकडे गेला. राधा रागातच म्हणाली, “सोनेरी कळस अंगात तुळस”. आता मात्र कावळा जोशात निघाला.


अंगणातली तुळस बघून त्याला आनंद झाला. तो खिडकीत जाऊन बसला. त्यांनी पाहिले एक मुलगी अभ्यास करत होती. कावळा म्हणाला, ताई ताई, राधाला हवी गणिताची वही.” गणिताच्या वहीचे नाव काढताच मेधाला आठवले की, राधाची वही आपल्याकडेच आहे. मग तिने पटकन वही कावळ्याला दिली. कावळा आनंदाने उडत उडत राधाच्या घरी पोहोचला. कावळ्याने मोठ्या आनंदाने वही राधाला दिली. त्यावेळी राधाला खूप आनंद झाला. तिने कावळ्याचे खूप आभार मानले आणि म्हणाली, “अरे कावळ्या... किती रे तू घाई करतोस! अरे जरा शांतपणे पत्ता नीट ऐकून घेतला असतास तर एकाच फेरीत वही घेऊन आला असतास.” राधाचे बोलणे कावळ्याला कळलेच नाही... कारण राधाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच कावळा उडून गेला होता.

Comments
Add Comment

वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता