विशेष – लता गुठे
शारदीय नवरात्रीच्या हिंदू पौराणिक कथेनुसार, राक्षस -राजा महिषासुराशी झालेल्या नऊ दिवसांच्या युद्धाच्या कालावधीत दुर्गा मातेने नऊ रूपे नऊ अवस्था धारण केल्या असे मानले जाते.
या नवदुर्गांची भारतातील विविध राज्यांमध्ये आराधना केली जाते. आजवर मला समजायला उमजायला लागल्यापासून नवरात्र उत्सव साजरा करताना मी पाहत आले आहे. नवरात्र सुरू होण्याआधी संपूर्ण घर अंगण स्वच्छ करून नंतर देवघरात घट बसविला जातो. तो घट मातीचा असतो. आणि घटासमोर नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला जातो. घटाच्या बाजूने शेतातील स्वच्छ जागेतील माती आणून त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य पेरून त्याला पाणी घालून देव्हाऱ्यामध्ये हार चढविला जातो. त्याला पहिली माळ, दुसरी माळ असे म्हटले जाते. घरोघरी हे घट बसवले जातात.
आठव्या दिवशी अष्टमीला प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये होम हवन केले जाते. नंतर कुमारीका पूजन, भोजन करून उपवास सोडले जातात. आणि दहाव्या दिवशी सिमोलंगन करून दसऱ्याचा सण साजरा करतात. या दिवशी शस्त्रास्रांचे पूजन करून आपट्याची पाने म्हणजे सोने वाटले जाते. यामागे अनेक रामायण महाभारतातील कथा जोडल्या गेल्या आहेत. नंतर घटाचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करतात. हे सर्व आजीने केले, नंतर आईने आणि आता मी करत आहे. कारण यापासून सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच त्याबरोबर मन व शरीर शुद्धी होते. ज्या नवदुर्गांच्या नावाने उत्सव साजरा केला जातो त्या नवदुर्गांची माहिती देणारा वराह पुराणातील एक श्लोक. तो श्लोक असा आहे…
प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति ,कूष्माण्डेति चतुर्थकम्।।
पंचमं स्कन्दमातेति, षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमम्।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना।।
माता दुर्गेची नऊ रूपे ही संपूर्ण भारतभर पूजली जातात हा उत्सव थोड्याफार फरकाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या शैलपुत्रीची घटस्थापना करून पूजा केली जाते. पर्वतीय राजा हिमावतची ती कन्या आहे, आणि ती हिंदू माता देवी महादेवीचे प्रकटीकरण रूप आहे.
नवरात्री उत्सव हा नवरात्रीचाच का असतो? याचे उत्तर वरील विवेचनांमधून मिळते. चराचरांत जी शक्ती चैतन्य रूपात आहे. ती प्रत्येक स्त्रीमध्ये सामावलेली आणि नवनिर्मितीच्या मुळाशी असलेली शक्ती, जिचा नवरात्रीमध्ये जागर केला जातो. ही एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपल्या ठिकाणी असलेल्या ज्ञान केंद्रामध्ये समाविष्ट व्हावी आपल्यातील दुर्गुणांचा नाश व्हावा यासाठी आदिमायेला प्रार्थना करून तिची पूजा बांधली जाते. उपास करून शरीर शुद्धी केली जाते.
माझं बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे तेथील सण, उत्सव, रिती, परंपरा याच्याशी माझी नाळ जोडली गेली आहे. आपले सण उत्सव शेतीशी तसेच ऋतूंशी जोडले गेलेले आहेत. मग ती संक्रांत असो होळी असो किंवा नवरात्र… या सर्वांना हजारो वर्षांची परंपरा आहे रामायण महाभारतापासून ही परंपरा चालत आली आहे.
उदा… आपली संस्कृती परंपरा ही ग्रामीण भागातील शेतीशी निगडित आहे. हे मी वर नमूद केलेलेच आहे. सर्वांचा पोशिंदा शेतकरी या मातीला आपली आई मानतो. कारण या ऋतूमध्ये पीक काढणीला येतात. सर्व ठिकाणी आनंदी आनंद असतो. त्या धरणी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीपासून घट बनवितात त्या गटांमध्ये नवीन येणारी धान्य मातीमध्ये रुजवतात. प्रत्येक दिवशी नदीवर आंघोळ करून नदीचे पाणी आणून घटाला जल अर्पण करतात आणि रानफुलांचे हार करून प्रत्येक दिवसाची एक माळ बनवतात. दररोज एक माळ अशा नवरात्रीच्या नऊ माळा आदिशक्तीला म्हणजेच धरती मातेला मोठ्या भक्तीभावाने अर्पण करतात.
नऊ दिवस अखंड दीपप्रज्वलित ठेवला जातो याचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरणात रोगजंतूचे प्रमाण वाढलेले असते. अखंड दिव्याच्या उर्जेने हे प्रमाण कमी होते. दुसरे कारण म्हणजे दिवा हे मांगल्याचे शुभ प्रतीक समजतात. दिव्याच्या प्रकाशामुळे अंधार तर नाहीसा होतोच त्याबरोबरच वातावरण प्रसन्न होते. तटस्थपणे दिव्याकडे पाहून नंतर ध्यान धारणा केली तर दिव्याचा प्रकाश हा आपल्या शरीरामध्ये उतरतो आहे याची जाणीव होते. त्यामुळे मनातील अंधकारही नाहीसा होतो. म्हणून देवीपुढे नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्याची प्रथा आहे.
ग्रामीण भागामध्ये कुलदेवतेच्या पूजेला जास्त महत्त्व आहे. कुलदेवतेची आराधना केल्यामुळे सुख, शांती, आनंद, आरोग्य चांगले लाभते. यासाठी प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते. मातीचा नवा कोरा घट कुंभाराकडून विकत आणला जातो, नंतर शेतातली माती आणून एका नव्या टोपलीत किंवा ताटामध्ये माती पसरवतात त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य पेरतात आणि त्यावर परत मातीचा थर देऊन पाणी शिंपडले जाते मातीवर तो नवीन घट ठेवून त्यामध्ये पाणी टाकून एक पैशाचे नाणे त्यामध्ये टाकतात आणि त्या घटावर एक छोटी मातीची वाटी ठेवून पंचोपचारे घटाची पूजा केली जाते. शेवटी देवीची आरती करून देवीची आळवणी केली जाते…
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
सर्व संकटांना दूर करणारी अशी देवी माता सदैव भक्तांसोबत राहून त्यांचे रक्षण करते. हा मनातील दृढ विश्वास, निष्ठा, श्रद्धा हीच माणसाला सकारात्मक ऊर्जा तर देतेच त्याबरोबर दृढ विश्वासही मिळतो. जीवनात कितीही संकट आली तरी दूर करणारी निर्गुण निराकार शक्ती आपल्यासोबत आहे ही भावनाच माणसाला सर्व संकटांपासून दूर करते. म्हणूनच घरातील स्री नऊ दिवस उपवास करते. आणि देवीची पूजा करते.
नवरात्र उत्सवामध्ये स्त्रियाच घट का बसवतात? याचे कारण म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. जमिनीत बिया टाकून धान्य उगविले. स्री ही नवनिर्मितीचा स्रोत समजली जाते. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रिया अन् अपत्य जन्माला घालून मानवाचा वंश टिकविणाऱ्याही त्याच. स्त्रीसत्ताक गणसमाजात ही धारणा होती सृजनाचे, नवनिर्मितीचे काम फक्त स्त्रियाच करू शकतात. याच धारणेतून पुरुषही आदिशक्तीपुढे नतमस्तक होतात. घट हा स्त्रीच्या पवित्र गर्भाशयाचे प्रतीकही समजला जातो. देवीच्या कृपेने नवनिर्मितीच्या सृजन प्रक्रियेला आशीर्वाद मिळावा आणि संसाराचा वेल वाढत रहावा यासाठी भारतातील सर्वच भागांमध्ये वेगवेगळया पद्धतीने नवरात्र साजरी केली जाते. काही भागांमध्ये अष्टमीला कुमारिका पूजन करतात. कारण कन्येला आपल्याकडे लक्ष्मीचे रूप मानतात. म्हणजेच कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून तिची पूजा करून तिला जेवायला वाढतात.
आपल्याकडे महाराष्ट्रात जी देवीची साडेतीन शक्तीपीठ समजली जातात त्या ठिकाणी गोंधळी कवड्याच्या माळा घालून संबळ वाजवत देवीची स्तुती असणारी कवनं म्हणतात. देवीचा गुणगौरव गात तिच्या शौर्याची गाथा गातात.
नवव्या दिवशी प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये होम हवन केले जाते. होमात कोहळा, नारळ अर्पण करतात. होमात नैवेद्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडतात. दसऱ्याच्या दिवशी पुरुष मंडळी सीमोल्लंघनाला जातात त्यावेळेला घट हलवला जातो. घटांमध्ये अंकुरलेले धान्य घेऊन गावातील मंदिरामध्ये ते जातात आणि देवांसमोर ठेवतात. आणि सुख समृद्धीची प्रार्थना करतात. ते उगवलेले धान्य हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करून शस्त्रास्त्राची पूजा करून. आपट्याची पाने सोने म्हणून सर्व मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेट म्हणून वाटतात. अशा रीतीने उत्सवाची सांगता होते.
जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते की, नवरात्र उत्सवामागे जी सांस्कृतिक पारंपारिक भावना आहे ती अलिकडे समजून न घेता फक्त उत्सव साजरा करायचा एवढाच हेतू त्यामागे असतो. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आणि त्याचे फोटो काढून माध्यमांवर पाठवायचे एवढाच हेतू दिसतो. मिरवणुकीमध्ये अतिशय वाईट पद्धतीने गाणे म्हणून नाच केला जातो. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होते जाणाऱ्या येणाऱ्यांना खूप त्रास होतो. डीजेचा भयानक मोठा आवाज यामुळे लहान मुले, आजारी माणसे, अभ्यास करणारी मुले यांना किती त्रास होत असेल याचाही विचार केला जावा.
उत्सवामागील खरा अर्थ समजून घेऊन जर आपण नवरात्र उत्सव साजरा केला तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. सोहळ्याओहळ्यात न पडता पर्यावरणाला हानी न पोहोचता इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे वर्तणूक करून नवरात्र उत्सव साजरा करुयात.
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी ती पहिली नवदुर्गा आहे, आणि देवी सतीचा
पुनर्जन्म आहे.