Thursday, January 16, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलउचकी कशी लागते?

उचकी कशी लागते?

कथा – प्रा. देवबा पाटील

अशाच एका दिवशी रोजच्यासारखी जयश्री खेळून आल्यावर हातपाय व तोंड धुऊन नि कोरडे करून आईजवळ स्वयंपाकघरात गेली. ती आईशी काही बोलणार एवढ्यात आईला उचकी लागली. तशी जयश्री म्हणाली, “बघ बरं आई, काल मला ठसका लागला तेव्हा बाबांनी माझी आठवण केली नाही असे तू म्हणालीस. पण आता आजीने तुझी आठवण केली म्हणूनच तर तुला उचकी लागली नं?”

“नाही गं बाळा, आठवणीचा व उचकीचा काहीच संबंध नाही.” आई म्हणाली, “ तीही प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. आपली छाती व पोट यांच्यामध्ये एक पातळ पडदा असतो. त्याला मध्यपटल असे म्हणतात. आपण ज्यावेळी श्वास घेतो तेव्हा हे मध्यपटल थोडेसे प्रसरण पावते व किंचितसे खाली जाते. त्यामुळे छातीची पोकळी थोडी मोठी होते व हवा फुप्फुसात जाते. उच्छ्वासाच्या वेळी फुप्फुसातून हवा बाहेर फेकली जाते, छातीची पोकळी लहान होते व हे मध्यपटल आकुंचन पावून वर येते. काही कारणाने या मध्य पटलाजवळील मज्जातंतू अचानक उद्दीपित होतात व हे मध्यपटल जोराने वर जाते किंवा झटकन खाली येते. यावेळी जर श्वासनलिकेतून हवा आत शिरत असेल व तिला काही अडथळा निर्माण झाला तर तिचा “उक” असा आवाज होतो त्यालाच उचकी लागली असे म्हणतात. उचकी थांबण्यासाठी किमान एक पेलाभर साखरपाणी किंवा मीठपाणी प्यावे. तसेच कानात बोटे घालून सुमारे वीस सेकंद कान बंद करावेत. जीभ थोडा वेळ तोंडाच्या बाहेर काढावी आणि “आ” वासावा. बसल्या बसल्या गुडघे छाती जवळ आणून दाबून धरावेत. आठवण केल्याने उचकी लागते ही एक भ्रामक समजूत आहे. म्हणून या तात्पुरत्या उपायांनी उचकी न थांबल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे. ”आता एकसारखे बसून बसून जयश्रीच्या पायांना मुंग्या आल्यात. ती म्हणाली, “आई माझ्या पायांना मुंग्या आल्यात. या मुंग्या कोठून येतात गं?” असे विचारीत ती उभी राहिली व आळीपाळीने आपले पाय जमिनीवर आपटू लागली.

आईचा कांदा कापून संपला होता. रुमालाने आईने आपले नाकडोळे कोरडे केले. आपले हात पुन्हा स्वच्छ धुतले. काही बटाटे व टमॅटो घेतलेत. त्यांनाही स्वच्छ धुवून घेतले नि विळ्याने कापणे सुरू केले. आई सांगू लागली, “शरीराच्या एखाद्या भागाला मुंग्या येणे म्हणजे त्या भागात झिणझिण्या येणे व तो भाग किंचितसा बधीर होणे, थोडासा हलका वाटणे. आपण एकाच स्थितीत जर बराच वेळ बसलो तर आपल्या हातातील किंवा पायातील त्या भागातील मज्जातंतूंवर दाब पडतो. मज्जातंतू दबल्याने ते स्पर्शज्ञानाचा संदेश मेंदूकडे पोहोचवू शकत नाहीत. म्हणून त्या भागातील संवेदना कमी होतात व त्या भागाला मुंग्या येतात. तसाच दाब रक्तवाहिन्यांवर पडतो. त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये अडथळा निर्माण होतो व त्या भागाला रक्तपुरवठा नीट होत नाही, कमी होतो. त्यामुळे त्या भागातीलही संवेदना कमी होतात व तेथे मुंग्या येतात.”

“अशा मुंग्या आल्यास त्या घालविण्यासाठी काय करावे आई?” जयश्रीने विचारले. “मुंग्या आल्या म्हणजे त्वरित हातपाय थोडे सैल सोडून मोकळे करावेत म्हणजे रक्ताभिसरण नीट सुरू होते, मज्जातंतूवरील दाबही निघून जातो व मुंग्याही निघून जातात. तू आता पाय आपटले तसे हळूहळू पाय आपटावेत; परंतु काहीच कारण नसताना हातापायाला जर वारंवार मुंग्या येत असतील व त्या लवकर जात नसतील तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. अशावेळी डॉक्टरला आपली तब्येत जरूर दाखवावी.” आईने उचित मार्गदर्शन केले.

“ बरोबर आहे आई. आता मी जाते माझ्या अभ्यासाला.” तिने असे म्हणताच त्या मायलेकींचे त्या दिवसाचे संभाषण तेथेच थांबले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -