ठाणे : मराठा समाजाबाबत सर्वच राजकिय पक्षांची उदासिनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवुन देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) “मराठा पॅटर्न” राबवण्याचा यल्गार केला आहे. या अनुषंगाने आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीब सुरू झाला असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला प्रविण पिसाळ, प्रविण कदम, दत्ता चव्हाण, दिनेश पवार, रमेश चौधरी, संतोष पालांडे आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना, समन्वयक अॅड. सुर्यवंशी यांनी, यापूर्वी राणे समितीच्या अहवालावरून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही, नंतर युती सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.तेव्हा, आम्हाला केवळ गृहित धरले जाते, असे असंविधानिक आरक्षण देण्याऐवजी ५० टक्यांच्या आतच आरक्षण द्यावे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोग तसेच शिंदे समितीनेही अनुकुल अहवाल दिला असे असतानाही ४० वर्ष झाली तरी मागण्या मान्य होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठा पॅटर्न राबवणार आहे. तसेच आगामी एक महिना ठाण्याच्या चौकाचौकात “मराठा जोडो अभियान” राबवुन मराठा समाजाला जागरूक करणार आहे.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासह चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद असल्याने मराठा उमेदवार देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे विधानसभेत १ लाख ३५ हजार मराठा मतदार तर ओवळा – माजीवडयात ५ लाख मतदारांपैकी १ लाख ५० मराठा, कोपरी- पाचपाखाडीत ८० हजार आणि कळवा – मुंब्रा मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदार आहेत. याकडेही मराठा समन्वयकांनी लक्ष वेधले.
या आहेत मराठा समाजाच्या मागण्या
- कोपर्डी अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी.
- ५० टक्याच्या आत टिकणारे आरक्षण हवे.
- जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
- ओबीसीसह सर्व जातींचे फेर सर्वेक्षण व्हावे
- सारथी उपकेंद्र ठाण्यात उभारून त्याची व्याप्ती वाढवावी
- ठाण्यात मराठा हॉस्टेल व मराठा भवन व्हायला हवे
- सगेसोय-यांची अंमलबजावणी नेमकी कशामुळे अडली हे स्पष्ट करावे.
- मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.