Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसमाजरंग बदलायला हवेत...

समाजरंग बदलायला हवेत…

आजच्या समाजाने प्रत्येक सण साजरा करताना सामाजिक भान ठेवणे गरजेचे वाटते. देवीच्या सर्व अवतारांची, स्वरूपांची पूजा मांडत असताना घराघरांतील स्त्रीशक्तीचा होणारा गौरव ही अभिव्यक्तीची उच्च पातळी ठरू शकते. खरे तर आजच्या घडीला स्त्रीची असलेली बलस्थाने, तिचे कर्तृत्व, तिच्यातील अनेकांगी सुप्त शक्ती वारंवार प्रत्ययास येऊनही या स्त्रीलाच कुटुंबात, समाजात तिच्या इतमामाप्रमाणे आदरणीय स्थान देण्यास आपण का कचरतो, याचा विचार यानिमित्ताने व्हायला हवा.

विशेष – स्वाती पेशवे

विविध आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेल्या आजच्या समाजाने प्रत्येक सण साजरा करताना सामाजिक भान ठेवणे गरजेचे वाटते. नवरात्रीचे हे दिवसही त्याला अपवाद नाहीत. देवीच्या सर्व अवतारांची, स्वरूपांची पूजा मांडत असताना घराघरातील स्त्रीशक्तीचा होणारा गौरव ही अभिव्यक्तीची उच्च पातळी ठरू शकते. महिलांच्या सुरक्षेसाठी आता जागर नऊ रात्रींपुरता मर्यादित राहू नये.

सगळीकडे नवरात्रोत्सवाच्या रंगांची उधळण होत असताना, प्रकृतीतील सर्जनकाळाचा बहर अनुभवत असताना आणि संस्कृतीतील परममंगल दिवसांचे साजरीकरण होत असताना चराचरात भरून उरणाऱ्या ऊर्जेचा अनुभव आपल्यातील प्रत्येकाला येत आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात वर्षाधारा बरसल्या आणि या सणावर संपन्नतेच्या हिरव्याकंच रंगाचे लेपन झाले. शेताशिवारात रुजणारी वा परिपक्व अवस्थेतील पिके आपल्याला वेगळीच आश्वस्तता देत आहेत. अशा या रम्यतेत भक्तीभावनेला अंकुर फुटणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यातूनच हे दिवस आदिमायाशक्तीची सेवा करण्याचे, तिच्या अफाट आणि अलोट शक्तीपुढे नतमस्तक होण्याचे आणि पूजा-अर्चनेद्वारे तिला प्रसन्न करून घेण्याचे… सध्या समाजमन शक्य त्या सर्व प्रकारे तिच्या आराधनेत गर्क आहे. मात्र हे सगळे करत असताना सद्यस्थितीचे भान ठेवणे क्रमप्राप्त आहे.

उत्सवप्रिय समाजाची सणा-समारंभाकडे पाहण्याची मानासिकता बदलत आहे. खरेदीसाठी उत्तम काळ, महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान वस्तूंच्या खरेदीतून मिळणाऱ्या सुखाची अनुभूती यानिमित्ताने एकत्र येत होणाऱ्या गप्पाटप्पा आणि मेजवान्या, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली होणारा प्रचंड खर्च आणि कल्लोळ करत व्यक्त होणारा आनंद हे साजरीकरणाचे अलीकडचे परिचित रूप आहे. पण अलीकडच्या काळात स्त्रियांविषयी घडलेल्या आणि आपल्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह उमटवून गेलेल्या घटनांचा, अघोरी कृत्यांचा परामर्श घेतला तर यंदाच्या नवरात्रीच्या साजरीकरणामागे वेगळे पैलू असण्याची गरज लक्षात येते.

आज एकीकडे संपूर्ण समाज गरबा, जोगवा, जागर, व्रतवैकल्ये, उपवास, घागर फुंकण्यासारखे कार्यक्रम यात मग्न आहे. अनवाणी चालणे, ठरावीक दिवशी ठरावीक रंगाची वस्त्रे परिधान करणे, कुमारिकांचे आणि सुवासिनींचे पूजन करणे यांसारख्या गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. खणानारळाने देवीची ओटी भरण्यासाठी पहाटेपासून देवळांसमोर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. पण भक्तीचा आणि भक्तांचा हाच ओघ समाजातील दुष्टशक्तीचे निर्दालन करताना का आटतो, याचाही विचार यानिमित्ताने व्हायला हवा. घरामध्ये नंदादीप अखंड तेवत असताना बलात्कार पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पेटवल्या गेलेल्या मेणबत्त्या शांत तर होत नाहीत ना, हे आपणच बघायला हवे. कारण समाजातील उपद्रवींना घाबरणारी, घराबाहेर पडताना बिचकणारी, घरात-दारात-संस्थेत-रुग्णालयात, थोडक्यात कुठेच स्वत:ला सुरक्षित न समजणारी प्रत्येक स्त्री याच आदिमायाशक्तीचे सूक्ष्म रूप आहे. त्यामुळे आता तरी दांभिकपणा त्यागून आणि पाप-पुण्याच्या आभासी हिशेबामध्ये न अडकता प्रत्येक देवीभक्ताने स्त्रीशक्तीमध्ये दडलेले देवीचे रूप ओळखणे आणि तिचा यथोचित सन्मान ठेवत आदरपूर्वक वागवणे गरजेचे आहे. थोडक्यात, नवरात्रीचा हा जागर आता नऊ रात्रींपुरता राहता कामा नये. समाजातील सकारात्मक शक्तींनी एकत्र येऊन धरलेला हा फेर, रंगलेला गरबा वा अंगणात मांडलेला हादगा प्रतिकात्मक पद्धतीने अखंड फिरत राहिला तरच त्या कवचात स्त्री स्वत:ला सुरक्षित समजू शकेल.

हल्ली सण-उत्सवाची खऱ्या अर्थाने जाणीव होते ग्रामीण भागात. या भागात आपले पारंपरिक सण साजरे होताना पाहणे हा एक वेगळाच आनंद असतो. पावसामुळे सर्वत्र चांगला पाणीसाठा झालेला असतो. नद्या, ओढे वाहत असतात. शेत-शिवार हिरवाईने नटलेले असते. अशा या उत्साही वातावरणात नवरात्रीच्या तयारीचा उत्साह आणखी वाढतो. नवरात्र सुरू होण्याच्या काही दिवस आधी गावाजवळील ओढ्यावर, नदीवर, तळ्याकाठी वा आपापल्या शेतात बहुतांश स्त्रिया एकत्र येतात. येताना घरातील सर्व कपडे धुण्यासाठी सोबत आणलेले असतात. वाहत्या, मोकळ्या पाण्यात सर्वजणी एकमेकींच्या सहकार्याने कपडे धुण्याचा कार्यक्रम पार पाडतात. धुतलेले कपडे काठावर लगेच वाळत घातले जातात. या ठिकाणी लवकर येणे, येताना जेवणाचा डबा बरोबर आणणे, एकत्र जेवण आणि थोडी विश्रांती, नंतर सायंकाळी धुवून वाळवलेले सर्व कपडे घेऊन घराकडे परणे हा कार्यक्रम ठरलेला असतो. आज शहराजवळील धरणांच्या पाणीसाठ्यालगत अशाच प्रकारे गर्दी पाहायला मिळते. पुरेशी स्वच्छता झाल्याशिवाय नवरात्राचे पुरेपूर समाधान मिळत नाही, अशी अनेक स्त्रियांची भावना असते.

दुसरीकडे, या दिवसात शेतांमध्ये पीक तरारून आलेले असते. झेंडूची शेती बहरलेली असते. नवरात्रात झेंडूला चांगली मागणी असल्याने या कालावधीत फुले उपलब्ध व्हावीत, असे शेतकऱ्यांचे नियोजन असते. त्यानुसार झेंडूच्या फुलांची काढणी, ती बाजारात नेणे यासाठी लगबग सुरू असते. नवरात्रात घरोघरी घट बसवले जातात. या घटाचे महत्त्व मोठे आहे. या घटासाठी पवित्र ठिकाणची माती आणून त्यात गहू, हरभरे, जोंधळे, भात, जवस, सातू, राळे, उडीद, मका अशी सात धान्ये पेरायची, त्यावर कलश ठेवायचा, कलशात सप्त नद्यांचे पाणी भरायचे. पाण्यात सोने, चांदी, मोती, प्रवाळ, चांदीचे-तांब्याचे नाणे घालायचे. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, सुपारी वहायची. घटावर अंबेची प्रतिष्ठापना करायची. रोज नव्या फुलांची माळ देवीच्या मस्तकी रूळेल अशी सोडायची. नऊ दिवस रोज नवी माळ. देवी एकदा स्थानापन्न झाली की, तिला नऊ दिवस, नऊ रात्र हलवायची नाही. रोज सवाष्ण जेऊ घालायची. देवीचे वैशिष्ट्य असे की, ती नऊ दिवस आणि नऊ रात्र झोपत नाही. अर्थातच भक्तानेही नव-रात्र जागरण करायचे. नऊ दिवस उपवास करायचा. परंपरेनुसार अहोरात्र तेलाचा वा तुपाचा नंदादीप देवीसमोर तेवत ठेवायचा. प्रत्येकाच्या चालीरितीनुसार यात थोडाफार फरक असेल. पण मुळात ही पूजा सृजनाची, निर्माणशक्तीची!

ही देवी आदिमाता आहे. देवांनाही ‌‘त्राहि माम्‌‍‌’ करून सोडणाऱ्या महिषासुराचा वध करण्यास ती सिद्ध झाली आहे. तिचे रूपडे पाहा. ती अष्टभुजा आहे. शिवाने दिलेले त्रिशूळ, विष्णूने दिलेले सुदर्शन चक्र, वायुदेवाने दिलेले धनुष्य आणि बाणांचा भाता, अग्निदेवाने दिलेली गदा, महाकालाने दिलेली तलवार, यमाने दिलेली ढाल, इंद्राने दिलेला अंकुश, वरूणदेवाने दिलेला नागपाश आणि विश्वकर्म्याने दिलेली कुऱ्हाड अशी आयुधे आपल्या आठ हातांमध्ये घेऊन ती असुराचा नाश करण्यास सिद्ध आहे. सर्व शक्तींचे प्रतीक असलेला सह हेच तिचे वाहन आहे. हीच आदिमाता गावोगावी वेगवेगळ्या नावाने पुजली जाते. कोलकत्यातील दुर्गा किंवा कालीमातेचा नवरात्रोत्सव खूप जल्लोषात साजरा होतो. गोव्यात शांतादुर्गा, म्हाळसा, कामाक्षी इत्यादी देवींच्या मंदिरात नवरात्रोत्सव खूप वेगळ्या रूपात साजरा होतो. महाराष्ट्रात अनेकांची कुलदैवत असलेली कोल्हापूरची महालक्ष्मी, रेणापूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी ही देवीची तीन शक्तीपीठे आणि वणीची सप्तशृंगनिवासिनी जगदंबा हे देवीचे अर्धे शक्तीपीठ अशी साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात महत्त्वाची मानली जातात. त्या ठिकाणचा नवरात्रोत्सव बहारदार असतो. अमरावती, नागपूर, चंद्रपूर याबरोबरच आदिमातेची मंदिरे आहेत तिथे नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा होतो.

मंगलदायिनी, तेजस्विनी, रुद्रावतारी मर्दिनी अशी ही आदिशक्ती ! हिचे प्रत्येक रूपच मुळी पूजनीय ! कधी दुर्गा, कधी भवानी तर कधी गौरी म्हणून ही जगन्माता पूजली जाते. गुर्जर समाजातही रात्री गरबा, रासक्रीडा खेळून नवरात्री जागवल्या जातात. आपल्याकडे नवरात्रीचे नऊ दिवस सासुरवाशिणी, माहेरवाशिणी एकत्र येऊन हादग्याचा फेर धरतात. हत्तीची तसबीर मध्ये ठेवून किंवा हत्तीचे चित्र किंवा हत्तीची रांगोळी काढून त्याची पूजा करतात. त्यामागे हस्त नक्षत्राची पूजा करण्याचा उद्देश आहे. मुली, बायका फेर धरतात. फेर धरता धरता खास हादग्याची गाणी म्हणतात. गाणी म्हणून झाल्यावर प्रत्येकाने आणलेली खिरापत ओळखली जाते. ही खिरापत सर्वजणी मिळून एकत्र बसून खातात. यातील गाण्यांची रचना कथात्मक असते. घरात घडणाऱ्या घटनांचे ते वर्णन असते. त्यात पूर्वीच्या काळातील स्त्रीमनाचे भावविश्व उलगडून दाखवले जाते. माहेरचे ओतप्रोत कौतुक आणि सासरचे काहीसे विरोधी चित्रण असते. त्यात काहीशी अतिशयोक्ती असते. मैत्रिणींचे चिडवणे, हसरे-बोचरे चिमटे, सासू-सुनांचे रूसवे-फुगवे यात असतात. एकंदर, हादग्याच्या गाण्यांची अशी वेगळीच मजा आहे.

खरे तर आजच्या घडीला स्त्रीची असलेली बलस्थाने, तिचे कर्तृत्व, तिच्यातील अनेकांगी सुप्त शक्ती वारंवार प्रत्ययास येऊनही या स्त्रीलाच कुटुंबात, समाजात तिच्या इतमामाप्रमाणे आदरणीय स्थान देण्यास आपण का कचरतो, याचा विचार यानिमित्ताने व्हायला हवा. बाराही महिने स्त्रीत्वाचा आदर करण्याचा ‌‘जागर‌’ मनामनात होणे हेच खरे आधुनिक नवरात्रीचे फलित असावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -