ओंजळ – पल्लवी अष्टेकर
मानवाचे षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर. या षड्रिपूंना मानवी मनाचे शत्रू म्हणून ओळखले जाते. या षड्रिपूंची नकारात्मक वैशिष्ट्ये म्हणजे, हे रिपू मानवाला मोक्ष मिळण्यापासून रोखतात असे म्हटले जाते. या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र होण्यास अडचणी निर्माण होतात.
यात ‘काम’ म्हणजे मानवी मनात नित्य निर्माण होणाऱ्या इच्छा. यामध्ये मानवी मनाच्या सर्व इच्छांचा समावेश आहे. असंख्य वेळा माणूस आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. जसे की, घर, गाडी, चांगल्या पगाराची नोकरी. जर यातील इच्छा सातत्याने तीव्र प्रमाणात जाणवू लागल्या व त्यांचे संतुलन बिघडले की, मानव नानाविध व्याधींनी ग्रस्त होतो. काम जणू अग्नीप्रमाणे आहे, जेवढ्या जास्त प्रमाणात आपण आपल्या इच्छा पूर्ण करू, तेवढीच अग्नी अजून भडकते. त्यामुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य त्याच्या या इच्छा पूर्ण करण्यात पणाला लागते. एवढे करून त्याच्याजवळ समाधान टिकले तर विशेष?
षड्रिपूपैंकी आणखी एक घातक रिपू म्हणजे ‘क्रोध’.
संत तुकारामांनी आपल्या एका अभंगात क्रोधाविषयी वर्णन केले आहे.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाईं रे |
क्रोध-अभिमान गेला पावटणी
एक-एका लागतील पायीं रे ||
संतांनी क्रोधाला घातक म्हटले आहे. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी लोक आपल्या क्रोधावर ताबा ठेवू शकत नाहीत. अशा वेळेस अस्वस्थता, जास्त रक्तदाब, डोकेदुखी या गोष्टींना त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते. कधी आयुष्यात असणारे ताण-तणाव, कधी कौटुंबिक समस्या, तर कधी आर्थिक. यामुळे व्यक्ती क्रोधाच्या अधिन होऊ शकते. त्यामुळे क्रोधावर काबू मिळविण्यासाठी विविध गोष्टी सांगितल्या आहेत. श्वासांवर नियंत्रण, समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्याआधी विचार करून बोलणे व गरज पडल्यास ‘मानसोपचार तज्ज्ञांची’ भेट घेणे या गोष्टी नियमितपणे करणे जरूरीचे आहे.
तिसरा शत्रू म्हणजे ‘मद’. मद म्हणजे आपल्याकडे असलेल्या एखाद्या गोष्टीचा अति-गर्व असणे. आपण कोणीतरी महान व्यक्ती असून आपल्यावर कोणीही मात करू शकत नाही, त्यामुळे सर्वांनी आपले श्रेष्ठत्व स्वीकारून आपल्या इच्छेनुसारच वागले पाहिजे, असे वाटणे. ‘अति-अभिमान’ किंवा ‘अहंकार’ यामुळे व्यक्तीचे फार मोठे नुकसान होत असते. आशुतोषच्या ऑफिसातील त्याचे साहेब अहंकारी स्वभावाचे होते. साहेबांच्या समोर त्यांची खुशामत करणारे लोक त्यांना पसंत असत. साहेबांनी स्वत: खूप कर्तृत्वाने आताचे पद प्राप्त केले होते. घरी त्यांची पत्नी व मुले कायम त्यांच्या दडपणाखाली असत. त्यामुळे साहेबांचा ‘अहम्’ सदैव सुखावलेला असायचा.
मात्र अनिरूद्धला आपल्या साहेबांचे वागणे खटकायचे. त्याला वाटायचे की, “आपण आपल्या ऑफिसातील कामे, जबाबदाऱ्या परिश्रमाने पेलवतो, पण साहेबांच्या तोंडातून कौतुकाचा एक शब्दं निघत नाही.’’ पण अनिरूद्धला साहेबांच्या पुढे-पुढे करणे जमायचे नाही. याचा परिणाम म्हणजे साहेब व अनिरूद्ध यांचे नाते कायमस्वरूपी रूक्षं झाले. म्हणूनच अहंकार अर्थात मद स्वत:पासून दूर ठेवणे गरजेचे आहे. स्थिर चित्त, शांत मन यासाठी आवश्यक आहे.
आध्यात्माच्या मार्गाने, विवेकाने, सद्सदविवेकबुद्धीने व्यक्ती आपले आचरण सुधारू शकतो. हे कष्टाने साध्य होईल, पण असाध्य नक्कीच नाही. ‘मी’, ‘माझे’, ‘मला’ असा विचार दूर टाकून दिल्यास माणसाला हे जग अधिक सुंदर वाटेल. अहंकारी व्यक्तीच्या बाबतीत नवीन गोष्टी शिकणे, स्वतःच्या प्रगतीत बाधा येणे या गोष्टी होऊ शकतात.
चौथा षड्रिपू म्हणजे ‘लोभ’. सतत काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा म्हणजे लोभ. लोभातूनच अन्याय, फसवणूक, द्वेष व अहंकार उत्पन्न होतो. यासंदर्भात मिडास राजाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. ग्रीक देशात मिडास नावाचा राजा होता. तो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे भरपूर सोने होते. त्याचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. एके दिवशी एक ग्रीक देव डायोनिसस त्याच्या राज्यावरून चालला होता.
डायोनिससचा सहप्रवासी हरवला होता.मिडास राजाने त्याला शोधून डायोनिसस समोर उपस्थित केला. खुश होऊन त्याने राजाला एक इच्छा मागण्यास सांगितले. मिडास राजाने इच्छा मागितली की, त्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीचे सोने व्हायला हवे. त्याची इच्छा डायोनिससने पूर्ण केली. घरी जाताना त्याने खडकांना, झाडांना स्पर्श केला, मग ते सोन्यात बदलले. घरी पोहोचताच त्याने उत्साहाच्या भरात आपल्या मुलीला मिठी मारली. त्याची मुलगी सोन्यात बदलली. राजा मिडास खूप दु:खी झाला. अति-लोभ केव्हाही वाईटच. त्यामुळे व्यक्तीने समाधानाचा मंत्र जोपासावा, ज्यामुळे आपले जीवन समाधानी होईल.
‘मत्सर’ म्हणजे एखाद्याचा आनंद किंवा क्षमता पाहण्यास सक्षम नसणे, ज्याला इतरांचे सुख पाहून मत्सर होतो व हेवा वाटतो. आधुनिक युग हे स्पर्धेचे आहे. एखाद्या व्यक्तीची सातत्याने होणारी प्रगती दुसऱ्या व्यक्तीला सहन होत नाही, त्या व्यक्तीबद्दल मत्सर निर्माण होतो. कुठल्याही प्रकारची तुलना वाईटच. तरीही ऊर्ध्व तुलनेपेक्षा अधो तुलना बरी. कारण अधो तुलनेत इतरांच्या समस्या पाहून आपण त्या जमेल तशा सोडविण्याचा प्रयत्न करतो, आपल्या सभोवतालच्या जगाचे आपल्याला भान रहाते.
पाचवा षड्रिपू म्हणजे ‘मोह’. लाच, लालूच, आमिष, प्रलोभन यांना मोहाने ग्रासलेली व्यक्ती सहज बळी पडू शकते. समाजात अनेकदा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती विविध प्रलोभने दाखवून मोहाने अंकित व्यक्तींना फसवितात व त्यामुळे मोहाने ग्रस्त व्यक्तींची फसवणूक होऊ शकते. अलिकडे आपण एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविले, आर्थिक घोटाळा केला अशा बातम्या वाचत असतो. मोहामुळे माणूस गैरकृत्य करतो. मोहावर मात करण्यासाठी मन आपल्या ताब्यात ठेवणे जरूरीचे आहे. लाच, लुचपत, आमिषे, प्रलोभन यांना बळी पडणे टाळावे.
भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या १८ व्या अध्यायात एक अर्थपूर्ण श्लोक सांगितला आहे.
प्रवृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्ये भयाभये |
बन्धं मोक्षं च या वेत्तिबुद्धि: सा पार्थ सात्त्विकी ||
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्तीमार्ग व निवृत्तीमार्ग, भय व अभय, कर्तव्य व अकर्तव्य, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. आपल्या षड्रिपूंवर ताबा मिळवून समृद्धपणे आयुष्यात वाटचाल करा”.