मुंबई : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक प्रा. डॉ. तारा भवाळकर (Tara Bhavalkar) यांची दिल्ली येथे होणा-या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणा-या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत होती. डॉ. तारा भवाळकर यांच्यासह प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांची नावे चर्चेत होती. मात्र ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
डॉ. तारा भवाळकर यांनी चाळीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. अनेक पुस्तकं संशोधनात्मक आहेत. तिस-या बिंदूच्या शोधात, आकलन आणि आस्वाद, महामाया, माझिये जातीच्या, मायवाटेचा मागोवा, लोकपरंपरेतील सीता, सीतायन, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, लोकसंचित, लोकनागर रंगभूमी, मातीची रूपे इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
खूप खूप अभिनंदन डॉ.भवाळकर काकूंचे!!!👍👏👏🎉💐 मराठी आहे याचा गर्व पुन्हा पुन्हा आहे❤😊