राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येत्या विजयादशमीला, आपल्या स्थापनेची ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. संघाचे सातत्य, चिकाटी, संयम, अनुशासन, विशिष्ट वातावरणाचा आग्रह, राजकारणापासून दूर, आर्थिकदृष्ट्या केवळ स्वयंसेवकांवर अवलंबून, अनोखी प्रचारक पद्धती, आगळी नेतृत्व शैली, परिवर्तनशीलता, गृहस्थ कार्यकर्त्यांची फौज, कौटुंबिकता यांच्या जोपासनेतून शून्यातून सुरू झालेला संघाचा हा प्रवास आज विश्वव्यापी झालेला आहे.
विशेष – श्रीपाद कोठे, नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येत्या विजयादशमीला, आपल्या स्थापनेची ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. स्थापनेच्या वेळी कार्यकर्ते, निधी, कार्यालय, कार्यकारिणी, संघटनेचा प्रमुख, कार्यक्रमांची आखणी, एवढेच काय नावदेखील नसलेली ही संघटना आज देशातच नव्हे तर जगभरात विविध कारणांनी चर्चेचा विषय असते. अनेकांना हे आश्चर्य वाटते. म्हणूनच अलीकडे संघाविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांमध्ये वाढली आहे.
नागपूरचे एक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या प्रतिभेला संघाची कल्पना स्फुरली आणि १९२५ च्या विजयादशमीच्या दिवशी त्यांच्या घरीच संघाची स्थापना झाली. बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांची एक बैठक झाली. त्यात डॉ. हेडगेवार यांनी आपल्या मनातील कल्पना मांडली आणि आपण संघ सुरू करीत आहोत अशी घोषणा केली. त्यांच्या मनात आपल्याला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना असल्याने, कोणतीही घाई न करता त्यांनी हळूहळू संघटनेला आकार दिला. संघटनेचे नाव स्थापनेनंतर सहा – सात महिन्यांनी निश्चित करण्यात आले. ही नावनिश्चिती ही त्यांच्या काळातील पहिली मोठी घटना. त्यानंतर हळूहळू दैनंदिन शाखा, शाखेचे कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची योजना, वर्षभरातील सहा नैमित्तिक उत्सव, प्रार्थना, प्रचारक पद्धती, भारतभर संघटनेचा विस्तार, समाजात संघाला प्रतिष्ठा मिळवून देणे; या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या. १९३९ मध्ये नागपूर जवळच्या सिंदी गावी झालेली प्रदीर्घ बैठक ही त्यांच्या कार्यकाळातील शेवटची महत्त्वाची घटना. १९४० च्या जून महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला. १९२५ ते १९४० या पंधरा वर्षांत त्यांनी केवळ आणि केवळ संघाची वाढ यासाठीच कार्य केले. त्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वतःचा संसारही थाटला नाही किंवा डॉक्टरीचा व्यवसायदेखील केला नाही. व्यक्तिगत आणि संघटनेच्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत, प्रसिद्धी इत्यादींच्या मागे न लागता त्यांनी संघाचे कार्य केले. त्यांच्या या एकांतिक तपश्चर्येतच संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचे रहस्य दडले आहे.
डॉ. हेडगेवार यांच्यानंतर श्री. गुरुजी म्हणून सर्वपरिचित असलेले माधव सदाशिव गोळवलकर यांच्याकडे संघाचे सरसंघचालक हे सर्वोच्च पद आले. प्राणीशास्त्रात एमएस्सी आणि नंतर एलएल.बी. केलेल्या गुरुजींचा पिंड आध्यात्मिक होता. रामकृष्ण आश्रमाची दीक्षा त्यांनी घेतली होती आणि तिथेच संन्यस्त जीवन घालवण्याचा त्यांचा विचार होता; परंतु त्यांचे गुरू स्वामी अखंडानंद यांनी ‘तुझ्यासाठी दुसरे कार्य नियोजित आहे’ असे त्यांना सांगितले व त्यांना नागपूरला पाठवले. १९३२ सालीच त्यांचा डॉ. हेडगेवार व संघाशी संबंध आला होता. तो नंतर वाढत गेला. गुरुजी संघात अधिकाधिक सक्रिय होत गेले आणि डॉ. हेडगेवार यांच्यानंतर संघाचे प्रमुख पद त्यांच्याकडे आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप ठेवून संघावर बंदी घालण्यात आली आणि गुरुजींना कारावासात ठेवण्यात आले. तो दीड दोन वर्षांचा काळ हा संघासाठी आणि गुरुजींसाठी अतिशय खडतर आणि परीक्षेचा काळ होता. मात्र त्या काळानेच त्यांची क्षमता आणि नेतृत्व सिद्ध केले. प्रबळ संघटन, भारतभर विस्तार आणि वैचारिक पाया हे त्यांच्या ३३ वर्षांच्या संघाच्या नेतृत्व काळात घडून आले. १९७३ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरस हे संघाचे तिसरे सरसंघचालक झाले.
वकिलीची पदवी प्राप्त करणारे बाळासाहेब देवरस डॉ. हेडगेवार यांच्या काळापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. संघाची कार्यपद्धती विकसित करण्यात, देशभर प्रचारकांचे जाळे विणण्यात, संघावरील बंदीच्या काळात त्यांचे फार मोठे योगदान होते. सरसंघचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर साधारण वर्षभरातच पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी संघाचा सामाजिक विचार सुस्पष्ट शब्दात मांडला आणि ‘जर अस्पृश्यता हे पाप नसेल तर जगात काहीही पाप नाही’ अशा ठाम शब्दात संघ अस्पृश्यतेच्या विरोधात असल्याचे सांगितले. दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच देशात आणीबाणी लावण्यात आली आणि संघावर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली. देवरस यांच्यासह संघाचे हजारो कार्यकर्ते तुरुंगात डांबण्यात आले. शेकडो प्रचारक व कार्यकर्ते भूमिगत होऊन आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व आणि संचालन करीत होते. आणीबाणी विरोधातील लढा ही ‘दमाची लढाई आहे’ असा संदेश देऊन त्यांनी संघटनेचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले होते. आणीबाणी उठल्यानंतर संघावरील बंदीही मागे घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी संघाच्या कामाचा विस्तार आणि संघाची सामाजिक स्वीकार्यता वाढेल याकडे आवर्जून लक्ष दिले. त्यांच्याच काळात संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली आणि संघाने सेवाकार्य या विषयाला प्राधान्य देत देशभरात हजारो सेवा कार्यांचे जाळे विणले. अयोध्येतील राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांच्याच नेतृत्वात संघाने पूर्ण शक्तिनिशी भाग घेतला. १९९२ मध्ये अयोध्येतील वादग्रस्त इमारत धराशयी झाल्यानंतर संघावर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली. संघाच्या आजवरच्या वाटचालीत त्याच्यावर तीनदा घालण्यात आलेल्या बंदींपैकी दोन बंदी देवरस यांच्याच काळात घालण्यात आल्या. दोन्ही वेळी संघ कोणताही डाग न लागता बाहेर पडला. १९९४ मध्ये वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे त्यांनी सरसंघचालक पदाचा कार्यभार उत्तर प्रदेशातील प्रा. राजेंद्र सिंह यांच्याकडे सोपवला.
मानवीय अथवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाला आधार देणारा; सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात शिस्त, देशभक्ती आदी गुण जगायला शिकवणारा; या देशाची आणि देशाचा कणा असलेल्या हिंदू समाजाची सांस्कृतिक बैठक मजबूत करणारा; भारताच्या सुरक्षेबाबत आग्रही असणारा; अशा संघाच्या या कार्याची काही वैशिष्ट्ये आहेत. सातत्य, चिकाटी, संयम, अनुशासन, विशिष्ट वातावरणाचा आग्रह, राजकारणापासून दूर, आर्थिकदृष्ट्या केवळ स्वयंसेवकांवर अवलंबून, अनोखी प्रचारक पद्धती, आगळी नेतृत्व शैली, परिवर्तनशीलता, गृहस्थ कार्यकर्त्यांची फौज, कौटुंबिकता; यांच्या जोपासनेतून शून्यातून सुरू झालेला संघाचा हा प्रवास आज विश्वव्यापी झालेला आहे.
(क्रमश:)