नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड
त्याचं अगदी नवं नवं लग्न होतं.
नवं नवं असल्याने दोघांना ‘हवं हवं’ होतं.
लग्नानंतर पहिलंच व्याख्यान ऐकायला दोघे गेले होते.
व्याख्यानाचा विषय अतिशय रसभरा होता. तो होता ‘मुका घ्या मुका’ होता की, नाही इंटरेस्टिंग विषय?
व्याख्याती ‘वनमाला’ इनामदार चांगली तरणीताठी होती. सुंदर नि तनुमध्या होती. आवाज मस्त लागला होता नि ऐकणारी सारी लक्ष देऊन ऐकत होती. सारा तरुण वर्ग हो! मोठ्यांना वाटलं खूप तरी बायकोच्या धाकानं ते गैरहजर राहिले होते.
“तुम्हाला काय आंबटशौक हो? म्हणे मुका घ्या मुका.” बायको घरोघरी तणतणली. अगदी युनिफॉर्म घातल्यासारखी.
“तू पण चल ना!”
“मी तर येणारच आहे. यवढा इंटरेस्टिंग विषय आहे. सोडते की, काय? मी येणार म्हणजे येणारचं.”
असे थोडे फार सीनियर पुरुष नि बायका व्याख्यानाला आले होते. अर्थात आपापल्या ‘बेटर हाफ’च्या पहाऱ्यातच!
व्याख्यानात एकदम वनमाला बाईंनी धस्सकन् आख्ख्या पुरुष वर्गाला प्रश्न केला,
“तुमच्यापैकी कितीजण विवाहित आहेत?” जवळ जवळ पाऊणपट लोक विवाहित होते. त्यांनी हात वर केले.
“मग चुंबन म्हणजे काय? याची शिकवणी घेण्याची गरज नाही. बरं तुम्ही दुसरे असे किती आहेत की, ज्यांनी बायको खेरीज इतर स्त्रीचे चुंबन घेतले नाही?”
गर्दीतील पुरुष वर्ग स्तब्ध झाला. सारीच पंचाईत ‘हो’ म्हणावे तर बायकोचा धाक! नाही म्हणावे, तर बुळा, बुळचट या विशेषणांचा धाक. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून बायकोकडे बघितलं. भीत भीत इतर जमावाकडे बघितलं. विवाहित पुरुष गोंधळलेले दिसले. अविवाहित काही कमी गोंधळलेले नव्हते. त्यांच्या मनात काही तरुणी भरल्या होत्या. त्यांचे इंप्रेशन म्हणजे त्या तरुणींचे इंप्रेशन हो! त्यांना त्या त्या मनात भरलेल्या तरुणीचा हिरो व्हायचे होते असे पुरुष गोंधळलेले बघून वनमालाबाईंना हुरूप चढला.
“लाजू नका. बायकोला घाबरताय? संकोच सोडा. व्यक्त व्हा! मुका हा गालाचा पण असू शकतो. इंग्रज लोक तर ओळख होताच गाल पुढे करतात. गालाचा मुका निष्पाप असतो हो! इंग्रज लोकात! पण आता आपण पुरते इंग्रजाळलो आहोत. तेव्हा बिनधास्त सांगा. तुम्हापैकी किती जणांनी परस्त्रीच्या गालांवर ओठ टेकलेयत? हे विवाहित आणि अविवाहित दोन्ही पुरुषांनी सांगायचे आहे. सांगा पाहू! बी ऑनेस्ट. मला अत्यंत प्रामाणिक उत्तर हवे आहे.”
व्याख्याती समुदायाकडे बघत राहिली. घाबरत काही हात वर झाले. “मला आवडला तुमचा ऑनेस्टपणा. प्रामाणिकपणा.” आता आणखी काही हात वर झाले.
“मला सगळेच्या सगळे पुरुष मुकाप्रिय वाटतात.”
“तुम्ही करा ना हात वर. मी रागवायची नाही.” काही बायकांनी आपापल्या नवऱ्याला चढवलं. पण त्यांची सरसकट तयारी नव्हती. आता ‘करा हात वर’ असं चढवते आहे, पण रात्री जवळ यायची नाही. मग आली का पंचाईत? सारीच गुंडागडबड पंचाईत!
मग वनमाला बाईंनी प्रश्न सोपा केला.
“मला वचन हवं आहे समस्त उदारहृदयी स्त्री श्रोत्यांकडून की, आपापल्या पुरुषांना माफ कराल. ज्या उदार हृदयी नाहीत त्यांनी सभेतून उठून जावं.”
आता आपण ‘उदारहृदयी नाही’ असं कोणती बाई कबूल करेल हो? प्रत्येकीने आपल्या नवऱ्याकडे बघितलं.
“लग्नाआधी कधी तरी झाली असेल चूक! मी मुळीच रागवायची नाही.” असंही सांगून झालं.
पण भारतीय नवरे काही बधले नाहीत. एक्कही हात वर गेला नाही.
“आता मी समस्त स्त्री वर्गाला हाच प्रश्न करते. गालाचा मुका कोणाकोणाचा बरं घेतला आहे?” “म्हणजे परपुरुषाने.”
“मी लहान असताना पुष्कळदा पुरुष माझे गाल ओढत. मुका घेत.” एक स्त्री धीर करून म्हणाली.
“लहानपणी ना? आमचे पण गाल ओढायचे पुरुष. गालाचा मुका घ्यायचे. माझे वडील, काका. इतरांना मी जवळ फिरकू पण द्यायची नाही.” एक स्त्री चक्क खोटं बोलली.
“मी फार खरं उत्तर अपेक्षिते.” वनमाला बाई म्हणाल्या.
“मुका हा शब्द प्रक्षोभक असल्याने खरी उत्तरे मिळणार नाहीत. त्यातून भारतीय संस्कृतीत तर नाहीच नाही आणि आपापल्या बायकोसोबत तर त्रिवार नाही.” एक पुरुष धीर करून म्हणाला.
“बायकांनो, तुम्ही डोळे मिटून घ्या. शपथ आहे माझी.” असं वनमाला बाईंनी बायांना डोळे मिटून घ्यायला भाग पाडलं. त्यासरशी पुष्कळसे हात वर झाले. आपापल्या नवऱ्याचा हात वर गेला का? प्रत्येकीन बघितलंच चोरून. नि पुरुष वर्ग चक्क खोटं वागला. विवाहित एक्कही हात वर गेला नाही.