बाबा, वर्गाचा मी आता
झालोय मॉनिटर
वर्गाची सर्व जबाबदारी
माझ्याच शिरावर
वर्गाची शिस्त आता
मलाच बघावी लागणार
गडबड करणाऱ्यांची नावं
मी फळ्यावर लिहिणार
अभ्यास करणार नाही त्याला
समजावून मी सांगणार
ऐकलं नाही तर सरांकडे
तक्रार त्याची करणार
वर्गाचीही स्वच्छता आता
मीच जातीने पाहणार
कचरा कोण करतंय याकडे
बारीक लक्ष ठेवणार
सर्वांच्याही आधी मी
लवकर शाळेत पोहोचणार
बाई-सर नसतील तर मी
वर्ग छान सांभाळणार
मॉनिटर म्हणून वर्गात
वाढेल माझी वट
मुलांच्या मदतीला मी
धावून जाईन झटपट
वर्गाच्या भल्यासाठी बाबा
जेव्हा मी पुढे असेन
मॉनिटरचा बिल्ला तेव्हाच
छातीवर शोभून दिसेल
बाबा म्हणाले, “शाब्बास…!
हुशार माझा श्याम
विश्वास आहे मला बाळा
तू नेकीने करशील काम…!”
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) अपूर्वाई, नसती उठाठेव
वाऱ्यावरची वरात
बटाट्याची चाळ यांची
दिसे घराघरात…
तुझे आहे तुजपाशी,
अंमलदार, ती फुलराणी,
खोगीरभरती, पूर्वरंग
हे सर्व लिहिले कुणी?
२) कोलंबिया यानातून ती
अवकाशात गेली
सोळा दिवस अंतराळात
राहून परतली
पहिली भारतीय महिला
ठरली अवकाशयात्री
कोण आकाशकन्या
जिची साऱ्या जगात महती?
३) हिंगण्याला मुलींसाठी
‘बालिकाश्रम’ काढला
‘भाऊबीज’ गोळा करून
कामाचा व्याप वाढविला
श्रमातून ‘महिला विद्यापीठ’
साकार त्यांनीच केले.
‘भारतरत्न’ किताबाने
कोणास गौरविले?
उत्तर –
१) महर्षी धोंडो केशव कर्वे
२) पु. ल. देशपांडे
३) कल्पना चावला