अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीनं स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आमदार बच्चू कडू हे परिवर्तन महाशक्तीमध्ये सक्रीय झालेले असताना त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांनी बॅटला रामराम करत हातात धनुष्यबाण घेण्याचे संकेत दिले आहेत. राजकुमार पटेल यांच्या बैठकीचं एक पोस्टर व्हायरल होतं आहे त्यामध्ये बच्चू कडू यांचा फोटो आणि पक्षाचं नाव देखील दिसत नसल्यानं येत्या काळात बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडूंचा फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राजकुमार पटेल यांच्या ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडू यांच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळत आहे. राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे आमदार आहेत. 6 ऑक्टोबरला कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीसाठी व्हायरल होत असलेल्या ग्राफिक्स बॅनरवर प्रहारचं नाव आणि आमदार बच्चू कडूंचा फोटो गायब झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राजकुमार पटेल यांना विधानसभेसाठी मोठा शब्द मिळाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसणार का? प्रहारमधून आमदार राजकुमार पटेल बाहेर पडणार का? या चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाला याचे परिणाम भोगायला लावू
बच्चू कडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा
आमदार बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट इशारा दिला आहे. बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली. पण ती त्यांनाच घातक ठरणार आहे. त्यांनी एक घाव केला, आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळे राजकुमार पटेल हे राजकीय स्वार्थासाठी गेले असतील, आम्हाला त्याची पर्वा नाही. ते जिथे गेले, तिथे त्यांनी सुखाने राहावं, असं देखील बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, प्रत्येकाचा एक राजकीय स्वार्थ असतो. त्यामुळे जर राजकुमार पटेल हे जात असतील तर त्याची आम्हाला परवा नाही. त्यांनी जातील तिथे सुखात राहावं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर आम्हाला एक घाव केला, तर आम्ही मात्र त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ. तसेच शिंदे गटाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लावू. असे बच्चू कडू म्हणाले. त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही दहा खेडी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशी भूमिका आम्ही घेऊ. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ. आमचे काही पदाधिकारी आम्हाला आणखी सोडून जातील. काही राजकीय तर काही आर्थिक हेतूने सोडून जातील. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्याचं ऋण आमच्यात कायम आहे. पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच घातक ठरणार असल्याचा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला.