मनस्विनी- पूर्णिमा शिंदे
विजयादशमी अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना म्हणून साजरी होते. घट म्हणजे नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी नऊ धान्य. त्यामध्ये साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी अशा नवधाण्यांची मातीत पेरणी करून त्यावर कुंभ रचला जातो. हा मातीचा कुंभ म्हणजे घट सृजनाची घागर नवचैतन्याची. घटाच्या अवतीभोवती फुलांची, फळांची, नैवेद्याची आरास केली जाते. नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत अखंड नंदादीप तेवत असतो. देवीचा जागर केला जातो. रोज एक माळ वेगवेगळ्या ताज्या, रंगीबेरंगी, सुवासिक फुलांची तिला अर्पण केली जाते. तिच्याभोवती रांगोळी, सजावट, हळदीकुंकू, जागर, रोषणाई, फुलांची सजावट, अतिशय आकर्षक मांडणी केली जाते. नवदुर्गा देवीचे आगमन एक आनंदाचा, उत्साहाचा सण. दुर्गा मातेचे नऊ अवतार. नवदुर्गा स्त्री शक्तीला आणि आपल्यातील प्रत्येक स्त्रीला वंदन कारण नवदुर्गा म्हटले की, तो दुर्गा सप्तशतीतील श्लोकाचे स्मरण होते.
प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारीणी, तृतीयं चंद्रघंटेती, कूष्मांडेती चतुर्थकं, पंचमं स्कंद मातेती, षष्ठं कात्यायनीतीच सप्तम कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धीदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तीता उक्तांन्येतानि नामांनि ब्रम्हणैव महात्मनम.
इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घराघरांमध्ये देवीची रूपे साक्षात्कार होतातच. ती जेव्हा सुगृहिणी संसारी असते तेव्हाच ती “शैलपुत्री” असते. ती जेव्हा देवासमोर ध्यान भक्तीने तल्लीन होते तेव्हा ती “ब्रह्मचारिणी” असते. ती जेव्हा लेकरांवर, घरादारांवर आलेल्या संकटांचा संघर्ष करते, लढा देते तेव्हा ती “चंद्रघंटा” असते. ती जेव्हा लेकरांना शिकवते, घडवते तेव्हा ती “कुष्मांडा’’ होते. जेव्हा लेकरांवर माया करते तेव्हा ती ‘‘स्कंदमाता’’ होते. आपल्या सर्व कुटुंबाचे सुरक्षा देणारी सुरक्षा कवच ती “कात्यायनी’’ होते. न्याय सत्याच्या लढा देणारी ती “काळरात्री” होते. सर्व स्वरूपातून ती सौंदर्य, बल, रूप, गुणांची देवी ममतारूपी सुंदरी “महागौरी” ती एकाच रूपात अनेक रूपे होते. अनेक भूमिकातून दर्शन देते ती “सिद्धीरात्री”.
आता आपल्या सर्वांना समजलेच असेल क्षणोक्षणी, पावलोपावली, घरादारात आपल्याला भेटणारी ती नवदुर्गा, तेजस्विनी, यशस्विनी, कर्तृत्वशालिनी, सुगृहिणी स्त्री असते. या स्त्री शक्तीला वंदन. अन्नपूर्णा होऊन घरात सर्वांना उदरभरण तृप्ती देणारी तीच गृहलक्ष्मी होऊन घराला कुटुंबाला सांभाळणारी तीच सरस्वती, मुलाबाळांचा अभ्यास घेऊन त्यांना घडवणारी तीच दुर्गा, घरादाराला संकटाशी झुंज देणारी तीच कालिका चंडिका, घरादाराचे रक्षण करणारी स्त्रीची घराघरामध्ये सर्वरूपे आपल्याला पाहायला मिळतात. ती स्त्रीशक्ती तुम्हा-आम्हा सर्वांमध्ये, प्रत्येक गृहिणीमध्ये, प्रत्येक लेकीमध्ये, आईमध्ये, आजीमध्ये आहेच. आज नऊ नाड्या तोडून मायेच्या उदरातून जन्म देणारी माता. लाडाने सांभाळणारी आजी. आयुष्य सर्वस्व त्यागणारी पत्नी.
आपल्या पोटी जन्म घेऊन जीव लावणारी लेक, मायेची मैत्रीण, आईचे प्रतिरूप मोठी बहीण या सर्व दुर्गाशक्तीच्याच, नवदुर्गांचाच अवतार, साक्षात्कार आहेत. आज मात्र नवरात्रीचा नवदुर्गांचा जागर करण्याची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. आपल्या समाजात या देवी, माता, भगिनी, लेकी सुरक्षित आहेत का? तर नाही. जन्माआधी त्या उदरातही सुरक्षित नव्हत्या आणि जन्मानंतर त्या मंदिरात आणि ज्ञान मंदिरातही सुरक्षित नाहीत! रस्त्यावरून चालताना सुद्धा यांना मोकळा श्वास घेता यावा; अशी यांना सुरक्षा मिळावी आणि माणूस म्हणून जगता यावे. बस इतकच करा. या नवरात्रीला सगळ्यांनी संकल्प करूया. केवळ अनवाणी चप्पल न घालता नऊ दिवस उपवास करून देवी प्रसन्न होणार नाही? तर त्या देवीला तुम्ही पावित्र्य राखून तिची सात्त्विकता पाळा. त्या देवीच्या पवित्र, मंगल, शक्तीची सुरक्षा करा. फार काही करू नका, त्या स्त्रीशक्तीला वंदन करा, जी देवीच आहे! देवीचं प्रतिरूप आहे!! अन्याय, अत्याचार थांबवा. नाहीतर येथील प्रत्येकीला आपले अस्त्र शस्त्रास्त्र नक्कीच काढावी लागतील. याच देवीने विजयादशमीच्या दिवशी युद्ध जिंकून महिषासुर राक्षसाचा वध केला तोच “दसरा” म्हणून आपण साजरा करतो. अशा आजही महिषासुरांचा, दुष्ट जनांचा संहार करायची सध्याच्या युगात गरज आहे. आपणही असाच दसरा साजरा करण्यासाठी संकल्प करूया.
“स्त्री-पुरुष समानतेचे सोनं लुटूया! स्त्रीला देवी समजण्याआधी “माणूस” तरी समजूया.!!” जनजागृतीसाठी समाजाचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. “जागर स्त्री शक्तीचा, नवदुर्गांच्या सुरक्षेचा, स्त्री शक्तीला वंदन करण्याचा, सण विजयादशमीचा”.