विशेष – भालचंद्र ठोंबरे
महाभारतानुसार द्रौपदी पाच पांडवांची पत्नी असल्याने ती प्रत्येकासोबत एक वर्षाचा कालावधी घालवीत असे. ती कोणाही एका सोबत एकांतवासात असतांना इतर कोणीही तेथे प्रवेश करू नये असा नियम होता. तसेच हा नियम मोडणाऱ्याला एक वर्ष वनात राहावे लागेल, असेही आपसात ठरविल्याचा उल्लेख महाभारतात आहे. एकदा द्रौपदी व युधिष्ठिर एकांतवासात असताना एक ब्राह्मण अर्जुनाकडे आला व आपले गोधन एक राक्षस पळवून नेत असून त्यांचे रक्षण करण्याची याचना करू लागला.
अर्जुनाचे धनुष्य ज्या खोलीत होते त्याच खोलीत द्रौपदी व युधिष्ठिर एकांत वासात होते. तेव्हा नाईलाजाने अर्जुन त्या खोलीत शिरला व धनुष्यबाण घेऊन ब्राह्मणांच्या पशुधनाचे रक्षण केले. मात्र एकांतवासाबाबतचा नियम भंग झाल्याने नियमाप्रमाणे अर्जुन एक वर्ष वनवासात गेला.
वनवासात एकदा गंगातीरी फिरत असताना त्याची भेट नागकन्या राजकुमारी उलुपीशी झाली. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. उलुपीने अर्जुनाला आपल्यासोबत नागलोकात नेले. तेथे नागराजाने उलुपीचा विवाह अर्जुनाशी लावून दिला. एक वर्ष अर्जुन नागलोकांत राहिला. उलुपीने त्याला पाण्यात सहजतेने विचरण करण्याचा तसेच कोणत्याही जलचर प्राण्यांपासून भयरहीत होण्याचा वर दिला.
अर्जुनापासून उलुपीला एक पुत्र झाला. त्याचेच नाव इरावन. काही ठिकाणी याचा उल्लेख अरावन व इरवन असाही आहे. तो आपल्या वडिलांप्रमाणेच रूपसंपन्न, गुणसंपन्न व पराक्रमी होता. त्याने अनेक विद्या आत्मसात केल्या. तसेच तो मायावी युद्धातही पारंगत होता.
महाभारत युद्धात तो पांडवांकडून लढला. त्याने आपल्या अतुल पराक्रमाने विंद व अनुविंद तसेच शकुनीच्या गवाक्ष, आर्जव शुक्र, गज, वृषभ व चर्मवान नावाच्या भावांचा वध केल्याचा उल्लेख आहे. इरावनचा हा संग्राम पाहून दुर्योधनाने आपला राक्षस मित्र अलम्बूष यास इरावनशी युद्ध करण्यास पाठवले. अलम्बूष हा बकासुराचा भाऊ होता. हिरावण व अलम्बूष यांचे घनघोर युद्ध झाले. दोघांनीही मायावी युद्धही केले. अखेर अलम्बूष इरावनचा वध केला.
मात्र जखमी अवस्थेत मरणासन्न असताना त्याने अविवाहित न मरण्याची इच्छा श्रीकृष्णाजवळ व्यक्त केली. मृत्यूच्या दारात असणाऱ्या व्यक्तीशी कोण विवाह करणारॽ अखेर भगवान श्रीकृष्णांनी मोहिनीचे स्त्री रूप घेऊन त्याच्याशी विवाह केला व त्याच्या मरणानंतर एक दिवस विधवा म्हणून शोकही केल्याचा उल्लेख आहे.
अन्य एका आख्यायिकेनुसार पांडवांच्या विजयासाठी एका राजपुत्राचा बळी देण्याची गरज उत्पन्न झाली. तेव्हा इरावन यासाठी स्वतःहून तयार झाला. मात्र अविवाहित न मरण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. मात्र ज्याचे मरण लवकरच निश्चित आहे, त्याला मुलगी कोण देणारॽ अखेर श्रीकृष्णाने स्त्री रूप घेऊन इरावनशी विवाह केला व त्याच्या मृत्यूनंतर एक दिवस विधवेप्रमाणे शोकही केला असाही उल्लेख आहे. दक्षिण भारतात इरावनला किन्नर लोक देवाप्रमाणे मानतात व पूजतात. तामिळनाडूच्या वेल्लूपूरम जिल्ह्यातील कुवंगम येथे इरावनचे मंदिर आहे. तेथे इरावनची पूजा केली जाते. तामिळनाडूत वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून १५ ते १८ दिवसांचा एक उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान किन्नर इरावन देवतेशी विवाह करतात व दुसऱ्या दिवशी मंगळसूत्र तोडून विधवेचा वेष धारण करून शोक करतात.