हलकं-फुलकं – राजश्री वटे
थंडीची चाहूल लागते, वातावरणात प्रसन्नता जाणवते, शेवंती, केवड्याला बहर आलेला असतो…
कुंकवाच्या पावलांनी देवी दारापर्यंत येऊन उभी ठाकलेली… तिच्या स्वागताला घरची लक्ष्मी, घराचे सडा समार्जन करून दारी तोरण, अंगण रांगोळीने सुशोभीत करते, देव-देव्हाऱ्याला न्हाऊ-माखू घालते, दिवा घासून पुसून चकचकित करून तेलवात तयार करते, नऊ दिवस पुरेल असं!!
आतुरतेने वाट पाहत असते घरची लक्ष्मी… उंबरठ्यावरून प्रवेश करणाऱ्या देवीची… कोणत्या रूपात येईल आज… किती
रूपं तिची डोळ्यांत साठवून घ्यावी इतकी!!
ज्या ठिकाणी देवीचं मंदिर असतं, त्या गावातील वातावरणच भक्तीनं भारवलेलं असतं! प्रत्येक व्यक्ती देवीचरणी लीन झालेली असते, पूर्ण भरवसा देवीवर टाकून एक निर्धास्तपणा त्या गावाने कमावलेला असतो!!
नवरात्रात पहाटेच मंदिरातून घंटानाद सुरू होतो… सारं गाव त्या नादमय वातावरणात जागं होतं तेच मुळी देवीला हात जोडून…
अंबे जगदंबे, तूच आहेस गं माय!
माहूरच्या गडावरची देवी…
रेणुकामाता!
एक प्रचंड रूप…
तिच्या समोर बसा…
तिच्या डोळ्यांत
बघत राहा…
हसलीच पाहिजे ती प्रसन्न!!
एका गालात पेढे…
दुसऱ्या गालात विडे…
दर्शनात तल्लीन
भक्तगण वेडे!!
एकविरा व अंबाबाई…
दोन बहिणी एकाच गावांत…
शेजारी शेजारी!
दर्शनाला येणाऱ्यांना भरभरून
आशीर्वाद देणाऱ्या…
ओटीत मिळालेल्या बांगड्या, शेवंतीच्या वेण्या, साड्या… या दोघी हौसेनं नेसणार व भक्तांना दर्शन द्यायला नटून थटून बसणार, दर्शनाला आलेल्यांना नेत्रसुख देणार!
दर्शन घेऊन तृप्त मनाने देवळाच्या बाहेर आलेल्या स्त्रिया, देवीकडून प्रसाद म्हणून ओटीत मिळालेली साडी उराशी कवटाळत, शेवंतीची वेणी केसात माळणार… आई, तू धन्य आहेस!
हळदीकुंकू, धूप, फुलं यांच्या सुगंधाने देवालय भरून गेलेलं… भक्तांच्या तनमनाला जणू तो सुगंध लपेटून जातो… नऊ दिवस नुसता उत्सव, पहाटेच्या आरतीच्या गजरात परिसर दुमदुमून जातो… गाभाऱ्यात धुपाचा गंध अंगभर लपेटत घंटानाद आसमंतात भरून पावतो… असे धुपानं गंधाळलेलं गांव देवीच्या चरणी भक्तीमध्ये लीन असतं!
देवीला साकडं घातलं जातं…
ऊर भरून… पदर पसरून…
…आई, जोगवा दे!
किती पवित्र आभास!!
दे… बाई…. दे…!!!