खवणे व निवती श्रीरामवाडी या गावात पसरली शोककळा
वेंगुर्ले : निवती येथे समुद्रकिनाऱ्याच्या २०० मीटरच्या अंतरावर मच्छीमारी बोट पलटी होऊन यामध्ये दोन खलाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून याबाबत निवती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या बोटीवर १४ खलाशी होते. त्यापैकी १२ खलाशी पोहुन सुखरूप बाहेर आले आहेत. हे सर्व खलाशी स्थानिक असल्याची माहिती मिळत आहे.
निवती समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी काल शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान अनिता आनंद धुरी यांच्या मालकीची धनलक्ष्मी ही मच्छीमारी बोट १४ खलाशी घेऊन गेले होते. मच्छीमारी झाल्यानंतर आज शनिवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान ते निवती किनारपट्टीवर येत होते. किनारपट्टीच्या २०० मीटरच्या अंतरावर ही बोट आली असता, निवती समुद्र व खाडी यांचा ज्या ठिकाणी संगम होतो. त्या खाडीमुखाजवळ (मच्छीमाऱ्यांच्या भाषेत नस्त) याठिकाणी आल्यावर ही बोट अचानक पलली झाली.
बोट पलटल्यावर सर्व खलाशी पाण्यात पडले. दरम्यान यातील निवती श्रीरामवाडी येथील आनंद पुंडलिक पराडकर (५२) व खवणे येथील रघुनाथ उर्फ भाऊ येरागी (४९) हे दोघेजण बोट बुडाल्यावर हे दोघेजण मासेमारी करण्यात येणाऱ्या जाळ्यांमध्ये अडकल्यामुळे त्यांना बाहेर येता येईना त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
तसेच किनाऱ्यावरील येत असताना बोटीचे इंजिन बंद पडले आणि समुद्राच्या लाटेत ही बोट बुडाली असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र या घटनेतील बचावलेल्या खलाशी यांनी अद्याप आपला जबाब पोलिसांकडे दिला नसल्यामुळे नेमकी घटना कशी घडली हे समजू शकले नाही.
ही घटना समजतात निवती सरपंच अवधूत रेगे, यांच्यासह उपसरपंच गोविंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत मेतर, माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग अन्य निवती ग्रामस्थांनी घटनास्थळी धावून तातडीने मदतकार्य केले.