पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडले
अमरावती : अमरावती येथील नागपुरी गेट पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी आलेला जमाव हिंसक बनल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हिंसक जमावाने केलेल्या गदडफेकीत १० ते १२ पोलीस जखमी झाले. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीयाबादमधील महंत यतिनरसिंहानंद यांनी मुस्लीम धर्मगुरुबाबात केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविल्याचा आरोपावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करत, मुस्लीम समाजाचा एक गट नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचला. मात्र त्यानंतर अचानक काही आक्रमक लोकांच्या जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु केली आणि वातावरण तापले. पोलिसांनी रोखण्याचाप्रयत्न केला असता जमाववाढत गेला आणि पुन्हा पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु झाली. यामध्ये १० ते १२ पोलीस जखमी झाले. तर पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करण्यात आली. जमाव वाढत असल्याचे पाहून तत्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला आणि जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगविण्याची कारवाई सुरु होती.
सध्या परिसरात सीपी नवीनचंद्र रेड्डीं, डीसीपी, एसीपींसह १२०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यासोबत धार्मिक स्थळावरून सुद्धा लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.