मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमधील रतलाममध्ये मालगाडीचे २ डबे रुळावरून घसरले. मालगाडीत खूप डिझेल भरलं होतं, ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांना कळताच ते आपल्या घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल भरण्यासाठी आले. डिझेलसाठी लोकांची झुंबड उडाली. यावेळी तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्यांच्याकडे बघतच राहिले आणि डिझेलची लूट ही सुरूच होती.
ही मालगाडी बडोद्याहून भोपाळला जात होती. याच दरम्यान मालगाडीचे दोन डबे रतलामजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने मोठा अपघात टळला जरी असला तरी मालगाडीचे डबे डिझेलने भरल्याचं समजताच लोक घरातून बादल्या आणि कॅन घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी गेले. लोकांनी बादल्या आणि कॅनमधून डिझेल नेलं. काही लोकांनी तर याचे व्हिडिओही बनवले आहेत जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
https://x.com/Nitinreporter5/status/1842193760865972670
रेल्वे वाहतूक विस्कळीत
तब्बल १२ तासांहून अधिक काळ रेल्वे सेवा या घटनेनंतर प्रभावित झाली होती. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दिल्ली मुंबई मार्गावर झाला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मीणा यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १२ तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आजकाल गाड्या रुळावरून घसरल्याच्या अनेक घटना देशभरात समोर येत आहेत.