भालचंद्र कुबल – पाचवा वेद
सिग्मंड फ्रॉईड यांनी मनोलैंगिक विकासाच्या पाच अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यापैकीच सायको सेक्शुअल डेव्हलपमेंट ही अवस्था जन्मजातच असते, फक्त वाढणाऱ्या वयाच्या टप्प्यानुसार त्यातील सुखावस्थेची पुर्तता होत असते. जसे आई बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला स्तनपान करतानाची अवस्था तिच्यासाठी सुखावह असते असे फ्रॉईड सिद्ध करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती प्रत्येक व्यक्ती आपली सुखावस्थेची अवस्था पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. हे एवढे सैद्धांतिक दाखला देऊन लिहिण्यामागचे कारण एकच, जगातील ९९ टक्के मनोविश्लेषणात्मक नाटके (किंवा परफॉर्मिंग कलाकृती) याच सुखावस्थेशी निगडीत पूर्णत्वाच्या कथानकाचा भार वाहताना दिसतात. नाटक नामक सहजाकृती मनोरंजनाचे विश्लेषण खरं तर इतके क्लिष्ट असायला नको, मात्र त्या नाटकातील मुलभूत विचारधारणेचा उहापोह इतका गुरफटवून टाकणारा असतो. एखादे नाटक मला एखाद्या वयातच बघायला का आवडते? त्या नाटकात लेखकाने मांडलेल्या मुद्यांशी मी का सहमत होतो? तेच नाटक त्या आधीच्या वयात मला का आवडले नव्हते? या साऱ्या प्रश्नांच्या मागे एवढी मोठी थिअरी असू शकते याची एका ठराविक वयात सुतराम कल्पना नव्हती. परवाच “पाहिले न मी तुला” हे एक नुकतेच प्रकाशित झालेले नाटक पाहिले आणि त्यामागचा हा सिद्धांत नमूद करावासा वाटला. वाचकाना खरं तर नाटक चांगले आहे की वाईट? किंवा बघायचे की नाही? एवढं सांगा म्हणजे आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे, या मानसिकतेपर्यंत जर आजचा प्रेक्षक वर्ग आला असेल, तर त्याचे प्रबोधन नाट्यनिरीक्षणाच्या नावाने लिहिलेल्या या छोटेखानी लेखातून व्हायलाच पाहिजे, असा माझा आग्रह असतो, असो…!
नवरा बायकोच्या नात्यात जोडीदारांनी एकमेकांशी विश्वासार्ह व्यवहार करायला हवा असा शिष्टाचार, समाज संमत आहे. लग्न जसजसे जुने होत जाते, तसतसा एकमेकांना एकमेकांची सवय होऊ लागते. एकमेकांच्या गरजा, स्वभाव, आवडीनिवडी दोघांनाही सवयीच्या होऊन जातात. मग एकमेकांना गृहीत धरणे सुरू होते आणि त्यातूनच गैरसमजांचा बागुलबुवा उभा केला जातो. यात चूक कोण, बरोबर कोण? या प्रश्नांची शहानिशा करण्याची गरज नसते कारण हीच ती मनोलैंगिक विकास अवस्था असते. एकमेकांशी संवाद साधणाऱ्या क्रिया पुढे वाद, विसंवाद, वितंडवाद यात परावर्तित होतात आणि मग त्यात दडलेल्या संघर्षात एक कथानक जन्म घेते. पती-पत्नीतील नाते संबंधातील कथानके यापेक्षा वेगळे असे काहीच सांगत नसतात. मात्र प्रत्येक कथारूपाची पार्श्वभूमी वेगवेगळी असते.
सुनील हरिश्चंद्र हे सद्याच्या तरुण लेखकांपैकी सातत्याने क्रिएटिव्ह लिखाण करणारा लेखक. महाविद्यालयीन स्पर्धांमधून लिखाणात वैविध्य साधणाऱ्या या लेखकाने नाटक माध्यमात वेगवेगळ्या फॉर्मवर प्रयोग करून पाहिले आहेत. पाहिले न मी तुला या नाटकाच्या निमित्ताने या फॉर्मची दखल घेणे अत्यंत जरुरीचे आहे. सुनीलचा मी उल्लेख केलेल्या फ्रॉईडच्या सिद्धांताशी कदाचित संबंध आलाही नसेल; परंतु पती-पत्नीच्या नाते संबंधाच्या एका विशिष्ट अवस्थेचा सारासार विचार तो जेव्हा नाटकाच्या कथानकातून मांडतो, तेव्हा संघर्षाची उकल व त्याला मिळालेला न्याय सामाजिक तर्कानुसार पटतो. त्यामुळे जे प्रेक्षकांना पटते, ते एका अर्थी व्यावसायिकतेत सरस ठरतेच. वयाची तीशी ओलांडलेल्या तरुण जोडप्यांसाठी लिहिले गेलेले नाटक आहे. अंशुमन विचारे, हेमंत पाटील व सुवेधा देसाई या तीन पात्रात रचलेले कथानक नाविन्य किंवा नवे मुद्दे मांडत नाही मात्र विनोदी अंगाने पती-पत्नीतील नोकझोक प्रासंगिक प्रहसन मांडण्यात हमखास यशस्वी होते. दिग्दर्शकाने इंटिमेट थिएटरच्या फॉर्मचा वापर संपूर्ण नाटकात अनेक वेळा केलेला आहे. अंशुमन आणि हेमंत दोघेही प्रेक्षकांशी वारंवार संवाद साधत रहातात. प्रेक्षकांना प्रतिसाद ही द्यायला भाग पाडतात, इथेच नाटकातील पात्रांचे प्रेक्षकांशी बॉडींग निर्माण होते.
प्रसंग गतिमान व्हायला मदत होते. नाटकाच्या प्लस पॉईंट्सपैकी हा मुद्दा प्रकर्षाने नाटकाच्या गतीमानतेत आणि विनोदात भर टाकणारा ठरतो. मात्र या प्रक्रियेत सुवेधा देसाई कमी पडतात. एक तर त्या प्रचंड एकसुरी आणि
किंचाळून बोलतात.
स्वतःच्या अभिनयाची एक वेगळी परीभाषा निर्माण करण्याचा प्रयत्न लंगडा किंवा तोकडा ठरतो. अंशुमन विचारेंची अभिनयाची एक स्वतंत्र शैली आहे. जी स्लॅपस्टीक कॉमेडीही नाही किंवा तो सटल ह्युमरही नाही. हल्लीच्या त्यांच्या राजू बन गया जन्टलमन, किंवा वस्त्रहरण सारख्या नाटकात स्वतःचे वेगळेपण राखण्यात ते यशस्वी होण्यामागचे कारणच, ही त्यांची स्वतंत्र अभिनय शैली. तीच गोष्ट हेमंत पाटलांबाबत म्हणता येईल. सुत्रधार आणि प्रसंगानुरूप येत जाणाऱ्या विविध भूमिकांचे बेअरींग सांभाळणे यात ते कुठेही कमी पडत नाहीत. मात्र सुवेधा देसाई या दोघांनाही नकळत कॉपी करायला जातात आणि आवाजाची पोत विशिष्ट वरच्या पट्टीची असल्याने काही वेळानंतर त्या इरिटेटींग वाटू शकतात; परंतु एक गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी की, काही न घडणारे, चर्चा नाट्याशी जवळीक साधणारे “पाहिले न मी तुला” प्रचंड गतीमान आहे. जराही न रेंगाळणारे आणि प्रेक्षकांशी संवाद साधत राहिल्याने जिवंत अनुभव देऊन जाते. काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या डाएट लग्नाचा विषय देखील सेम होता. नट मंडळी अभिनयाने प्रेक्षकांना बांधूनही ठेवतं मात्र कुठे माशी शिंकली आणि नाटक बंद झाले, हा संशोधनाचा विषय आहे. या नाटकातही प्रकाश योजनेसाठी राजेश शिंदे, नेपथ्यासाठी संदेश बेंद्रे, संगीतासाठी निनाद म्हैसाळकर यांच्यासारखे क्रिएटीव हात असूनही प्रेक्षकांनी यांच्या प्रयत्नांना यशस्वी करावे. कमतरता कुणाच्यात नाहीत? कुठलेही नवरा बायकोचे जोडपे हे परिपूर्ण नाही, मात्र जे नाते आपण स्विकारलेय ते जपण्यातच खरे जगणे आहे.