Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेआता परदेशात दिवाळी फराळ पाठवा पोस्टाने!

आता परदेशात दिवाळी फराळ पाठवा पोस्टाने!

ठाणे डाक विभागाची विशेष सुविधा

ठाणे : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुख, समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ… लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना या मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. मात्र या विदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलेला आहे.

ठाणे विभागातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने भारताचे नाव उंचावत आहेत. दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. याचे उत्तर ठाणे डाक विभागाने शोधून काढले आहे.

डाक विभागाच्या ठाणे विभागाने यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे. या सुविधे अंतर्गत पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही खास पोस्ट ऑफिसेस मध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षीत पॅकेजींग आणि विशेष बुकींग काऊंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, ITPS या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे दर खाजगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.

ठाणे डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता पालक वर्ग आपल्या विदेशातील मुला मुलींना तसेच प्रियजनांना खास घरघुती आणि भारतीय बनावटीचे फराळ पाठवू शकणार आहेत.

या सुविधेचा लाभ ठाणे डाक विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन समीर महाजन, वरिष्ठ अधीक्षक, ठाणे डाक विभाग यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -