राजरंग – राज चिंचणकर
नाटकाची उत्साही टीम, मोजकीच पात्रे, निर्मात्याचा पाठिंबा आणि इतर तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्या व्यक्तींनी जीव ओतून केलेले काम या सगळ्यामुळे ‘मास्टर माईंड’ या नाटकाने अल्पावधीतच १०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचा सस्पेन्स-थ्रिलरबाज रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. अजय विचारे यांनी त्यांच्या ‘अस्मय थिएटर्स’ या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या नाटकाचा १०० वा प्रयोग रंगणार आहे. प्रकाश बोर्डवेकर लिखित या नाटकाची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. विजय केंकरे यांचे दिग्दर्शन, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि अशोक पत्की यांचे संगीत; अशी टीम या नाटकाच्या मागे सक्षमपणे उभी आहे.
‘मास्टर माईंड’ नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने संवाद साधताना निर्माते अजय विचारे म्हणतात, “आम्हाला खूप आनंद होत आहे. हा टप्पा आम्ही फार जलदगतीने पार केला आहे. २ फेब्रुवारीला आम्ही नाटक सुरू केले आणि ६ ऑक्टोबरला १०० वा प्रयोग होत आहे. या टप्प्यावर प्रेक्षकवर्गसुद्धा संख्येने वाढत आहे. त्यांच्या प्रतिक्रियाही खूप चांगल्या येत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी हे नाटक पाहिले आहे. केवळ मराठीच नव्हे; तर गुजराती रंगभूमीवरच्या मान्यवरांनीही आमच्या नाटकाची प्रशंसा केली आहे. त्यामुळे आम्ही केलेली निर्मिती यशस्वी झाली असल्याचा मला आनंद आहे”.
अभिनेता आस्ताद काळे व अभिनेत्री अदिती सारंगधर हे दोघे या नाटकात भूमिका रंगवत असून, त्यांची ही जोडी पुन्हा एकदा रसिकांनी उचलून धरली आहे. १०० व्या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर आस्ताद काळे भावना व्यक्त करताना म्हणतो, “आमच्या नाटकाचा शंभरावा प्रयोग ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होत आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या अवधीमध्ये आम्ही १०० प्रयोगांचा टप्पा गाठू शकलो, तो केवळ प्रेक्षकांचा पाठिंबा आणि त्यांच्या प्रेमामुळेच! प्रेक्षकांचा हाच पाठिंबा आणि प्रेम असेच आमच्या मागे कायम राहू द्या. शंभराव्या प्रयोगालाही प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे”.
या निमित्ताने बोलताना अदिती सारंगधर सांगतात की, “कोरोनाच्या काळानंतर नाट्यव्यवसाय थोडासा मागे पडला होता आणि त्या काळानंतर नाटकाचे शंभर प्रयोग होणे, ही खूप महत्त्वाची बाब आहे. मला हे नाटक करताना फार मजा येते. आस्ताद सोबतचे माझे हे तिसरे नाटक आहे. आमची काम करण्याची पद्धत एकमेकांना व्यवस्थित माहित आहे. हे वेगळ्या धर्तीचे नाटक असल्यामुळे प्रत्येक प्रयोगाला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद मिळत आहेत”.