मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
मुंबई : भाजपाला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता. मात्र आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केला. ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडुप येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे बोलत होते. या वेळी महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक विकास प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण करून हे प्रकल्प रोखण्यात आले. मात्र आपल्या सरकारने या सर्व प्रकल्पांतील अडथळे दूर केले. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी हटविली. आरेमध्ये कारशेड केले नसते तर आपण दहा वर्षे मागे गेलो असतो. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० हजार कोटी अधिक लागले असते. बालहट्ट आणि अहंकार यामुळे यापूर्वीच्या सरकारने मेट्रो कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयाने राज्याचे नुकसान झाल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.