ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठाणे येथे ३२,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. शहरी भागातील वाहतूकसुविधा वाढवणे, हे या प्रकल्पांचे विशेष उद्दिष्ट आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा केवळ महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा सन्मान नसून, भारताला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती देणा-या परंपरेला दिलेली मानवंदना आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील मराठी भाषक समुदायाचे अभिनंदन केले.
नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करताना पंतप्रधानांनी आज वाशिमला भेट दिल्याचा उल्लेख केला, जिथे त्यांनी देशातील ९.५ कोटी शेतक-यांना पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत निधीचे वाटप केले आणि अनेक विकास प्रकल्प सुरू केले.
ठाणे शहरात महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे नवनवीन टप्पे गाठले जात असल्याचे नमूद करून, ते म्हणाले की, आजचा प्रसंग राज्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवत आहे. आज ३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मुंबई एमएमआर क्षेत्रातील प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली असून, १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
पंतप्रधानांनी नमूद केले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना ठाणे शहराबद्दल विशेष स्नेह होता. ते म्हणाले की, ठाणे हे दिवंगत आनंद दिघे यांचेही शहर होते. “ठाण्याने भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, डॉ. आनंदीबाई जोशी दिल्या,” असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आजची विकास कामे या सर्व द्रष्ट्या व्यक्तींची स्वप्ने पूर्ण करत आहेत. आज सुरु झालेल्या विकास कामांसाठी पंतप्रधानांनी ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.
- या क्षेत्रात नागरी गतिशीलता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी आज सुमारे १४,१२० कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो लाइन-३च्या बीकेसी ते आरे जेव्हीएलआर विभागाचे उद्घाटन केले. या विभागात १० स्थानके असून त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन-३ हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर लाईन-३ दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांना प्रवासाची सोय उपलब्ध करून देईल.
- सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणा-या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी असून त्यात २० उन्नत आणि २ भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे.
- सुमारे ३,३१० कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.
- याशिवाय, पंतप्रधानांनी सुमारे २,५५० कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र प्रकल्पाच्या टप्पा-१ ची पायाभरणी केली. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम यांचा समावेश आहे.
- पंतप्रधानांनी यासोबतच सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणा-या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही केली. ठाणे महानगरपालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालये सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे.