ट्रायकडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक
नवी दिल्ली : फेक कॉल आणि मेसेजला आळा घालण्यासाठी ट्रायने (TRAI) नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार, ट्रायने १ कोटींहून अधिक मोबाईल नंबर्सवर कारवाई करून त्यांची सेवा बंद (SIM card block) केली असून ट्रायने घोटाळेबाजांना पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. गेल्या ४५ दिवसांत आणखी १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स आणि ६८० एंटिटीज (संस्थांना) ब्लॉक केल्या आहेत.
ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. ट्रायने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्पॅमर्सवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व्हिस प्रोव्हायडर्सना जारी करण्यात आल्या आहेत.
याआधीही ट्रायने घोटाळ्यात सहभागी झाल्यामुळे लाखो मोबाईल नंबर्स ब्लॉक केले होते. आतापर्यंत, ट्रायने १ कोटींहून अधिक मोबाईल नंबर्सवर कारवाई करून त्यांची सेवा बंद केली आहे. गेल्या महिन्यातही ट्रायने कठोर भूमिका घेत ३.५ लाख मोबाईल क्रमांक ब्लॉक केले होते. दूरसंचार विभाग आणि ट्राय युजर्सना स्पॅम फ्री सर्व्हिस क्वालिटी देण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्सना बल्क कनेक्शन, रोबोटिक कॉल्स आणि प्री-रेकॉर्डेड कॉल्स ब्लॉक करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
सप्टेंबरमध्येही ट्रायने ३.५ लाख अनव्हेरिफाइड एसएमएस हेडर आणि १२ लाख कॉन्टेंट टेम्पलेट ब्लॉक केले होते. १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नियमात, ट्रायने नेटवर्क ऑपरेटरना टेक्नॉलॉजीचा वापर करून URL, APK लिंक, OTT लिंक असलेले मेसेज ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
युजर्सला कोणतेही URL असलेले कोणतेही मेसेज प्राप्त होणार नाहीत. युजर्सना केवळ व्हाइटलिस्टमध्ये असलेल्या संस्था आणि टेलिमार्केटरकडून लिंक असलेले मेसेज प्राप्त होतील. तसेच, ट्रायने सुचविलेल्या मेसेज टेम्प्लेटवर आधारित URL किंवा OTP सारखी इतर संवेदनशील माहिती असलेले मेसेज व्हाइटलिस्ट करण्यात टेलिमार्केटर सक्षम असतील. युजर्सना व्हाइटलिस्टमध्ये नसलेल्या संस्था किंवा टेलिमार्केटरकडून मार्केटिंग करणारे कॉल येणार नाहीत.
ट्रायचा हा नियम सर्व मोबाइल नंबरवर लागू होतो, ज्याद्वारे मार्केटिंग कॉल केले जातात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक नंबरवरून मार्केटिंग किंवा कोणत्याही प्रकारचे प्रमोशनल कॉल करत असल्यास ट्राय तुमचे सिम कार्ड ब्लॉक करू शकते. मार्केटिंग कॉल करण्यासाठी वेगळे कनेक्शन घ्यावे लागेल, ज्यासाठी ट्रायने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.