नुकताच सप्टेंबर महिन्यात ‘रेडिओ विश्वास’ वर अमेरिकेतील मॉर्गनव्हिल मराठी शाळेच्या लहान मुलांनी एक कार्यक्रम सादर केला. ही मुले पाच ते आठ वर्षांची होती. अमेरिकेतच जन्मलेली होती. तेथे शनिवार-रविवार चालणाऱ्या मराठी शाळेत मराठी भाषा शिकली होती. त्यांना मराठी बोलण्याची सवय व्हावी; म्हणून त्यांच्या शिक्षकांनी रेडिओ श्रुतिका तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक मुलाने एक गोष्ट सांगितली आणि एकमेकांशी गप्पा मारत गोष्टींचा कार्यक्रम सादर केला. त्यांच्या मराठीला एक गोडवा होता. थोडीशी अमेरिकन उच्चारांची झाक होती खरी. पण तरीही त्यांचा प्रयत्न खूप वाखाणण्यासारखा होता. शिक्षकांनी व पालकांनी त्यांच्यावर घेतलेली मेहनतही कळत होती.
मी रेडिओ विश्वासवर ‘समन्वयक’ म्हणून सेवाभावी पद्धतीने काम करते आहे. ‘आजचे पाहुणे’ या कार्यक्रमात मी देशविदेशातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असते. त्यामुळे इतर देशांतील मराठी जगताशी संबंध जोडता येतो. त्या मुलाखती ऐकून अमेरिकेतील शिकागो येथील ‘मराठी विद्या मंदिरच्या’ को-ऑर्डिनेटर सुलक्षणा कुलकर्णी यांनी मला विचारले, “आम्हाला ‘रेडिओ विश्वास’साठी मुलांचा कार्यक्रम देता येईल का? आमची मुले मराठी कार्यक्रम अगदी उत्तम देतील.” रेडिओ विश्वास हा कम्युनिटी इंटरनेट रेडिओ. तो मोबाईल ॲपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. या रेडिओवरून बातम्या प्रसारित होत नाहीत. गाण्यांचे कार्यक्रम, मुलाखती, पुस्तकांवरील विवेचन आदी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारित होतात. रेडिओ ‘विश्वास’वर ‘बालविश्व’ हा छोट्यांसाठी असलेला कार्यक्रमसुद्धा सादर होत असतो.
स्टेशन डायरेक्टर हरिभाऊ कुलकर्णी यांच्याशी बोलून मी तिला संमती दिली. दहा दिवसांतच, सुलक्षणा कुलकर्णी यांनी कार्यक्रम रेकॉर्ड करून मला पाठवला. त्यांनी इसापनीतीतील गोष्टी, लहान मुलांच्या मनोरंजन करणाऱ्या ‘राजाने टोपी घेतली’ वगैरे सुरस कथा नाट्यरूपात सादर केल्या होत्या आणि पाच ते सात वर्षांची मुले उत्तम दिग्दर्शनासह शुद्ध मराठी बोलत होती. इतके शुद्ध मराठी महाराष्ट्रातही बोलले जात नाही. त्या मराठीचा नादच काही वेगळा वाटतो. ती मुले सुंदर मराठी बोलतात याचे श्रेय त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना द्यायला हवे. मात्र कार्यक्रम प्रसारणाच्या वेळेचा प्रश्न उभा राहिला. ‘रेडिओ विश्वास’वरील मूळ ‘बालविश्व’ कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी १० वाजता प्रसारित होत असे. पण अमेरिकेत त्यावेळी रात्र असते व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळा असतात. मग तेथील मुले तो कार्यक्रम ऐकणार कशी? स्टेशन डायरेक्टर कुलकर्णी साहेबांना मी सुचवले, की त्या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता करावे, तर अमेरिकेत मुलांना तो दिवसा ऐकता येईल. ‘रेडिओ विश्वास’ने तो कार्यक्रम सकाळी १० व रात्री १० वाजता असा दोनदा प्रसारित करण्याचे ठरवले आणि अमेरिकेतील मराठी मुलांचा कार्यक्रम तेथेही त्यांना व त्यांच्या पालकांना ऐकता येऊ लागला. शिकागो मराठी शाळेचा पहिला ‘परदेशी’ कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची श्रोत्यांकडून खूप वाहवा झाली.‘शिकागो मराठी विद्यामंदिर’चा कार्यक्रम अमेरिकेतील मराठी शाळांच्या ग्रूपवर फिरत होता. अन्य पालकांमध्ये त्यांच्याही मुलांना कार्यक्रमात घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली. मग मी न्यू जर्सी येथील ‘मॉर्गनव्हिल मराठी शाळे’च्या समन्वयक स्नेहल वझे यांच्याशी संपर्क केला. त्यांचे विद्यार्थीदेखील मराठीत कार्यक्रम सादर करण्यास उत्सुक होते.
शाळेने थोड्या मोठ्या मुलांना, सात ते अकरा वयोगटाच्या मुलांना घेऊन उत्तम विनोदी कार्यक्रम तयार करून पाठवून दिला. त्या कार्यक्रमाला अमेरिकेत ट्रंप-बायडेन या अध्यक्षीय निवडणुकीची पार्श्वभूमी होती, तर दुसऱ्या एका नाटुकल्यात, एक मराठी आजी भारतातून आणि एक अमेरिकन आजी अमेरिकेतून एकमेकींशी ‘झूम’वर बोलत आहेत असा गमतीदार ‘कन्सेप्ट’ रंगवला होता.
दरम्यान, अमेरिकेतील आणखी काही शाळांना संपर्क करून ऑडिओ देण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमेरिकेतील टॅम्पा येथील मराठी शाळेच्या समन्वयकांनीही इच्छा दर्शवली. अमेरिकेतील मराठी शाळांनी, त्यांची संस्कृती मराठी आहे हे दाखवणारे विषय निवडले होते. मुले ‘मराठीतील काही स्त्री रत्ने’ या शीर्षकाखाली सावित्रीबाई फुले, झाशीची राणी अशा व्यक्तिमत्त्वांवर बोलत होती. सहा वर्षांची मुले डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची माहिती सांगत होती. अमेरिकेतील मराठी शाळांमध्ये रामायण-महाभारत शिकवले जाते. तसेच, संतांचीही माहिती दिली जाते. तो त्यांचा अभ्यासक्रम असतो. ते सगळे यानिमित्ताने ‘रेडिओ विश्वास’वर प्रकट होत गेले.
दादरच्या ‘आव्हान पालक संघा’च्या शाळेच्या प्रेसिडेण्ट वंदना कर्वे यांचा प्रश्न वेगळाच होता. त्या म्हणाल्या, “आमच्या शाळेतील मुले ही ‘विशेष’ मुले आहेत.
पण ती स्वतः कामे करतात. स्वतःच्या पायावर उभी आहेत. आम्ही त्यांच्या हाताला काम दिले आहे.” वंदना यांनी त्या ‘विशेष’ मुलांची छान गाणी आणि संवाद असा कार्यक्रम पाठवला. कार्यक्रम प्रसारित झाल्यावर त्या मुलांच्या पालकांना खूप आनंद झाला. ‘बालविश्व’च्या यशात आणखी एक मोरपीस खोवले गेले !
शिकागो मराठी विद्यामंदिर यांनी “मराठी भाषा कशासाठी?” अशा शीर्षकाचा कार्यक्रम ‘मराठी भाषा दिना’साठी पाठवला होता, तो मुद्दाम नमूद करण्यास हवा. त्यांनी ‘आपल्या मुला-मुलात खेळते मराठी’ ही ओळ गायल्यावर त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे माझ्या लक्षात आला. त्यांनी, तेथील पालकांनी आणि शिक्षकांनी मराठी भाषेवरील प्रीती दाखवली होती. त्यांना मुलांना मराठी भाषाच नव्हे, तर मराठी सण समारंभ, खाद्यपदार्थ, सामाजिक उत्सव असे सगळे शिकवायचे आहे, आजी-आजोबांशी मराठीत संवाद साधायचा आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत करून घ्यायचा आहे. आम्ही मराठी भाषा मुलांना त्यासाठी शिकवत आहोत असे प्रतिपादन कार्यक्रमात केले होते. कार्यक्रम मुलांनीच सादर केला होता.
अमेरिकेतील मराठी शाळांचे समन्वयक पालकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवत होते. त्या वाचून माझाही उत्साह दुप्पट झाला.
मॉर्गनव्हिल मराठी शाळेच्या स्नेहल वझे म्हणाल्या, “आमच्या शाळेतील मुलांचा रेडिओ कार्यक्रमाविषयी उत्साह, उत्सुकता वाढली आहे. मुलं मराठी आणखी छान बोलू लागली !” आजही या मुलांच्या शिक्षिका त्यांच्याकडून कार्यक्रम बसवून घेऊन ‘रेडिओ विश्वास’वर माझ्या मार्फत पाठवीत असतात.
meghanasane@gmail.com
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…