पाहा कसं असेल वेळापत्रक?
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे लोकलबाबत (Railway) प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सातत्याने अपडेट समोर येत असतात. अशातच रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) विविध अभियांत्रिक कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेतला जातो. उद्या देखील प्रशासनाने तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जारी केला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात बाहेर फिरण्यासाठी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेने उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावे, असे आवाहनही केले आहे.
मध्य रेल्वे
ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद लोकल ठाणे – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार येईल.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल /बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल – ठाणे लोकल सेवा देखील बंद राहतील.
तसेच ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान, बेलापूर, नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका लोकल सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान ५व्या मार्गावर आज रात्री 11:00 ते रविवार सकाळी ९ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानच्या अप फास्ट मार्गावर रात्री ११ ते पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.