मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेतील आरे-बीकेसी मेट्रो टप्पा वाहतूक सेवेत दाखल होत असल्यामुळे मुंबईकरांना एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र महाविकास आघाडीने ‘मेट्रो ३’ प्रकल्पास विरोध करीत कारशेडचे काम रोखून धरले. त्याचा ‘मेट्रो ३’ प्रकल्पावर परिणाम झाला. प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे खर्च १४ हजार कोटी रुपयांनी वाढला. केवळ विरोधकांच्या भूमिकेमुळे खर्चात भरमसाठ वाढ झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. त्याचवेळी हा प्रकल्प यशस्वीरित्या पुढे नेणा-या राज्य सरकारचे तोंड भरून कौतुक केले.
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी दरम्यानच्या १२.५ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विकास कामांच्या लोकार्पण, पायाभरणी कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आरे-बीकेसी अंतर एक तासऐवजी केवळ २२ मिनिटांत पार करता येईल अशा या भुयारी मेट्रो टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांनी शनिवारी केले. ही मेट्रो मार्गिका भारत आणि जपानच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रतिक आहे. जपानाच्या मदतीमुळे हा प्रकल्प मार्गी लावणे सोपे झाले, असे सांगत पंतप्रधानांनी यावेळी ‘जायका’चे कौतुक केले.
एमएमआरसीने सोमवारपासून भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो धावणार असून मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
तिकीट दर
- आरे जेव्हीएलआर – सीप्झ – १० रुपये
- आरे जेव्हीएलआर – एमआयडीसी, मरोळ – २० रुपये
- आरे जेव्हीएलआर – सहार रोड, विमानतळ टी १ – ३० रुपये
- आरे जेव्हीएलआर – सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत – ४० रुपये
- आरे जेव्हीएलआर – बीकेसी – ५० रुपये
- आरे जेव्हीएलआर – कफ परेड तिकीट दर ७० रुपये
आरे – बीकेसी टप्प्यातील मेट्रो स्थानके
आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी २, सहार रोड, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत, बीकेसी.
वेळापत्रक
सोमवार ते शनिवार सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भुयारी मेट्रो सेवा सुरू राहील
रविवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सेवा सुरू राहील
दररोज ९६ फे-या
मेट्रो गाडी दर साडेसहा मिनिटांनी सुटेल. पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता, तर शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल. आरे – बीकेसीदरम्यान ९ मेट्रो गाड्या धावतील. या मार्गिकेवर ४८ मेट्रो पायलट सेवा देतील, यात १० महिला मेट्रो पायलटचा समावेश आहे. वातानुकूलित आणि स्वयंचलित, वाहनचालकमुक्त मेट्रो गाडी असली तरी गाडीत मेट्रो पायलट असणार आहे, ताशी ३५ किमी वेगाने भुयारी मेट्रो धावणार आहे. आरे – बीकेसी अंतर २२ मिनिटांत पार होणार. सध्या हे अंतर पार करण्यासाठी किमान एका तासाचा अवधी लागतो. आठ डब्ब्यांच्या मेट्रो गाड्या असून २५०० प्रवासी क्षमतेच्या गाड्या आहेत. सध्या आरे – बीकेसी मार्गिकेवरून दिवसाला साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.
आरे-कफ परेड प्रवासासाठी करावी लागणार मे २०२५ पर्यंत प्रतीक्षा
‘मेट्रो ३’ प्रकल्पातील बीकेसी – कफ परेड या दुस-या टप्प्याच्या कामाला ‘एमएमआरसी’ने वेग दिला आहे. दरम्यान, बीकेसी – वरळी आणि वरळी – कफ परेड अशा टप्प्यात काम करून ते वाहतूक सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरसीएल’चे नियोजन होते. पण आता मात्र यात बदल करून ‘एमएमआरसीएल’ने बीकेसी – कफ परेड असा दुसरा टप्पा निश्चित केला आहे. त्यानुसार या दुस-या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत या टप्प्याचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे ‘एमएमआरसीएल’चे नियोजन आहे. तर काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन हा टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोतून आरे-कफ परेड भुयारी प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना मे २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.