मुंबई : मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन आरोपींनी महिलेला स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅण्ड मागे नेत आळीपाळीने बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
२२ सप्टेंबरच्या रात्री पीडित महिला छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरात उभी होती. त्यावेळी दोन व्यक्ती तिथे आले. काही कळण्याच्या आत एका आरोपीने महिलेचे तोंड दाबले. आरडा-ओरड करून नये म्हणून दोन्ही आरोपींनी तिला धमकावत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या टॅक्सी स्टॅण्डच्या पाठीमागे घेऊन गेले.
दोन्ही आरोपींनी तिथे महिलेला धमकावले आणि आळीपाळीने अत्याचार करुन पसार झाले. या घटनेनंतर महिलेने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.