 
                            नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु असून पुढच्या महिन्यात दिवाळी (Diwali) सण येणार आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून विविध भेटवस्तूंसह बोनस (Bonus) दिला जातो. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA)सरकारने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे.
काल पार पडलेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनस योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी एकदम दणक्यात साजरी होणार आहे.
नेमकं कोणाला मिळणार बोनस?
रेल्वे विभागात वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत बोनस मिळणार आहे. ट्रॅक मेन्टेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्टेरियल स्टाफ अशा अनेक कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

 
     
    




