Saturday, November 9, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यएनपीएस वात्सल्य योजना...

एनपीएस वात्सल्य योजना…

उदय पिंगळे – मुंबई ग्राहक पंचायत

केवळ मुलांसाठी असलेल्या योजनांची संख्या मर्यादित आहे. म्युच्युअल फंडाच्या विविध मालमत्ता प्रकारांवर आधारित योजना आहेत. इन्शुरन्स कंपन्यांनी बचतीशी सांगड घालून आणलेल्या विविध योजना आहेत. मुलांच्या नावाने त्यांच्या पालकांना पीपीएफ खातेही उघडता येते. केवळ १० वर्षे वयाच्या आतील मुलींसाठी त्यांचे पालक ‘सुकन्या समृद्धी योजना’ घेऊ शकतात. या सर्वच योजना या मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, व्यवसायास भांडवल, भविष्यातील एकरकमी पैशांची गरज याचा विचार करून बनवल्या आहेत.यातील प्रत्येक योजना वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचे वेगवेगळे फायदे, तोटे आहेत. पण मुलांचा त्यांच्या निवृत्तीच्या नियोजनाएवढा दीर्घ विचार करून असलेली कोणतीही सरकार पुरस्कृत योजना नाही.

२३ जुलै २०२४ रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुलांची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा बळकट करणे आणि लवकर बचत करण्याची सवय लावणे या उद्देशाने सरकारकडून अशी योजना आणण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार अलीकडेच म्हणजे १८ सप्टेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे योजनेचे माहितीपत्रक प्रकाशित करून औपचारिकरित्या ही योजना बाजारात आली असून ‘एनपीएस वात्सल्य’असे तिचे नाव आहे. या योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) मार्फत केले जाईल त्यांचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी आहे. कोणतीही गुंतवणूक अधिक काळ केली तर त्याचा परतावा चक्रवाढ गतीने मिळतो हेच ध्यानात घेऊन म्युच्युअल फंडाप्रमाणे अप्रत्यक्षपणे शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात अधिक परतावा मिळेल. संपत्ती वृद्धिंगत होईल, जोखीम कमी होईल. हे यामागील प्रमुख सूत्र आहे.

या योजनेत पालक वार्षिक ₹१०००/- जमा करू शकतात. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. यामुळे मुलांसाठी शिस्तबद्ध बचत करण्याची सवय वाढेल. पाल्य सज्ञान होईपर्यंत पालकांद्वारे ही योजना चालवली जाईल. त्यानंतर या योजनेचे रूपांतर नियमित एनपीएस खात्यात किंवा नॉन एनपीएस योजनेत वर्ग करता येईल. खाते मुदत दीर्घ असल्याने या कालावधीत मोठी रक्कम जमा होऊन त्यात आकर्षक वाढ होईल. त्यामुळेच सरकारी वचनबद्धतेशी सुसंगत राहून एक सन्माननीय आर्थिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकेल.‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे खाते हे अल्पवयीन पाल्याच्या नावेच उघडण्यात येते. सज्ञान होईपर्यंत ते पालकांमार्फत चालवले जात असले तरी त्याचा लाभार्थी पाल्यच असेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथोरेटीकडील नोंदणीकृत पॉइंट ऑफ प्रेसेन्समार्फत ते काढता येते. यात पोस्ट, प्रमुख बँका, वित्तीय कंपन्या, पेन्शन फंड यांचा समावेश आहे. तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन खाते उघडण्याची सोय आहे. एनपीएस ट्रस्टकडून एनपीएस खाते एनएसडीएल, कॅम, के फिनटेक येथे ऑनलाइन पद्धतीने उघडता येते. तेथे ‘एनपीएस वात्सल्य’ खाते उघडता येईल.

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेचे स्वरूप म्हणजे अल्पवयीन पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, पालकाचे ओळख आणि निवासाचा पुरावा, पालकाचा पॅन किंवा फार्म ६० मधील घोषणापत्र, पालक अनिवासी भारतीय परदेशी भारतीय नागरिक असल्यास पासपोर्ट आणि अल्पवयीन व्यक्तीचे एनआरई किंवा एनआरओ खाते. खाते उघडताना ₹१०००/- जमा करणे गरजेचे असून दरवर्षी त्यात किमान ₹१०००/- भरणे आवश्यक असून कोणतीही कमाल मर्यादा नाही. खाते उघडल्यावर एनपीएस प्रमाणेच एक स्थायी ओळख क्रमांक (PRAN) दिला जाईल. व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे नोंदवलेल्या व्यवस्थापकांपैकी कोणत्याही एका व्यवस्थापकाची नेमणूक पालकास करावी लागेल. मालमत्ता कोणत्या पद्धतीने गुंतवावी त्याची निवड करावी लागेल.

यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यात १) समतोल गुंतवणूक पर्याय-यामध्ये ५०% गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाईल. जर एखाद्याने कोणताही पर्याय दिला नसेल तर त्यांना हा पर्याय हवा आहे असे गृहीत धरले जाईल. (Moderate lifecycle Fund- LC-५०) २) सक्रिय गुंतवणूक पर्याय-यामध्ये पालकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्यांना ७५% पर्यंत गुंतवणूक शेअरबाजार, १००% गुंतवणूक सरकारी रोखे किंवा १००% गुंतवणूक कंपनी रोख्यात करता येईल. याशिवाय ५% गुंतवणूक इतर पर्यायी गुंतवणूक प्रकारात येईल. ३) स्थिर जोखीम गुंतवणूक पर्याय – या प्रकारात पालकांच्या जोखीम घेण्याच्या प्रकारानुसार शेअरबाजारात ७५% (LC-७५), ५०% (LC-५०), २५% (LC-२५) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता येईल. पाल्याचा १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास खात्यात जमा रक्कम बालकास मिळेल. पालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदारास ओळख आणि वास्तव्याचा पुरावा देऊन खाते चालवता येईल जर जोडीदार नसेल तर सक्षम न्यायालय ज्यास पालक म्हणून मान्यता देईल त्याला हे खाते पुढे चालू ठेवता येईल.

१८ वर्षे पूर्ण होण्याआधी यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या जमा रकमेच्या २५% रक्कम पाल्याचे शिक्षण, आजारपण यांसारख्या कारणाने काढून घेता येईल. अशी संधी तीन वर्षांच्या अंतराने जास्तीत जास्त तीनदाच असेल. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तीन पर्याय आहेत. त्यात पाल्याचे नवे केवायसी देऊन सदर खाते एनपीएस टियर १ मध्ये बदलून घेणे, जमा रक्कम अडीच लाखांहून कमी असल्यास सर्व रक्कम काढून घेऊन खाते बंद करणे, जमा रक्कम अडीच लाखांहून अधिक असल्यास २०% रक्कम काढून उरलेल्या रकमेतून तेव्हा उपलब्ध असलेली पेन्शन योजना घेणे. पालकांनी मुलांच्या कल्याणाचा विचार करावा हे योग्य असलं तरी-आपल्या मुलांना ही योजना पुढे कदाचित चालवावी लागेल अशी सक्ती करावी का? यापेक्षाही अधिक चांगल्या योजनेचा शोध घेता येईल का? या योजनेत भविष्यात गुंतवणूकस्नेही बदल होतील का? इतका टोकाचा म्हणजे मुलांच्या निवृत्तीचाही विचार आतापासून करावा का? यावर चिंतन केल्यावर जर आपण समाधानी असलात, तर सरकार पुरस्कृत ही योजना उपलब्ध झाली आहे. यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते. त्यातील बरीचशी रक्कम भांडवल बाजारात येणार असल्याने त्यातील परताव्याची निश्चित हमी देता येत नाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -