मुंबई : धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याही समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेसा भरती रखडली आहे. ही भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. याशिवाय धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समिती गठीत करण्यात आली आहे. त्यासाठी कायद्याचा मसुदाही तयार केला जातो आहे. मात्र, धनगर समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात करण्याला नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांकडून विरोध केला जातो आहे.
या मुद्द्यावरून आज नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजातील आमदार आक्रमक झाले. त्यांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. या आमदारांना जाळीवरून बाहेर काढण्यात आले. मात्र, हे आमदार आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
यासंदर्भात बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, “पेसा भरतीसाठी आदिवासी समाजातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मुळात ज्या आदिवासी समाजाने आम्हाला निवडून दिले, त्यांचे सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग? एकाही नेत्याने त्यांच्याकडे जाऊन बघितले नाही. आम्ही सरकारशी चर्चा करतो आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मी आधी आदिवासी आहे. नंतर विधानसभा उपाध्यक्ष आहे”, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली. यावेळी नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाल्याचेही बघायला मिळाले.
यासंदर्भात अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी सांगितले की, “गेल्या दोन महिन्यांपासून पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी समाजातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यासंदर्भात आम्ही २९ ऑगस्ट रोजी सरकारशी चर्चा केली होती. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. पण कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर आम्ही ३० सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन केले होते. त्यावेळीही दोन दिवसांत निर्णय घेऊ असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, तरीही निर्णय झाला नाही. तेव्हापासून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात भेटीसाठी वेळ मागतो आहे. मात्र, त्यांनी वेळ न दिल्याने आमदारांचा संयम सुटला आणि नरहरी झिरवळांसह काही आमदारांनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या”, असे ते म्हणाले.
नरहरी झिरवळ यांनी चार दिवसांपूर्वीही आमदारांसह मंत्रालयाच्या प्रवेशाद्वारासमोर आंदोलन केले होते. यावेळी बोलताना, “सरकार आमचे ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे. पेसा भरती असेल, किंवा धनगरांना आदिवासींतून आरक्षण देण्याचा निर्णय असेल, याविरोधात गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, याबाबतीत निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. थेट कायदे केले जातात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.