Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखचॅम्पियनशिपकडे भारताची वाटचाल...

चॅम्पियनशिपकडे भारताची वाटचाल…

बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सध्या या टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर असून ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी आहे. शेजारचा श्रीलंका तिसऱ्या क्रमाकांवर आहे. श्रीलंका संघही त्यांच्याविरोधातील कसोटी सामने जिंकत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी आपला दावा मजबूत करत आहे. बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जवळपास रद्द झाल्यातच जमा होता. त्यामुळे चॅम्पियनशिपमधील भारताच्या वाटचालीवर अडथळे निर्माण होण्याची भीती निर्माण झाल्याने भारतीय खेळाडूंच्या छावणीवर चिंतेचे सावट होते; परंतु तब्बल पावणेतीन दिवसांचा खेळ पावसामुळे, अंधुक प्रकाशामुळे वाया गेलेला असताना खेळ झाला तरी सामना अनिर्णित राहणार हे जवळपास सर्वांनीच गृहीत धरले होते; परंतु नियतीच्या व भारतीय क्रिकेट संघाच्या नशिबी काही वेगळेच लिहिले होते.

पावणेतीन दिवसांचा खेळ वाया गेल्यावर भारतीय संघ वेगळ्याच जिद्दीने खेळला. ‘हारी बाजी को जितना आता है हमे’, अशा थाटात भारतीय संघाने मैदानात वावरून बांगलादेशला सव्वादोन दिवसांच्या खेळात पराभवाची धूळ चारली. पहिला डाव बांगलादेशचा गुंडाळल्यावर भारतीय संघाने आक्रमक खेळ करत शतकाच्या जवळपास जात आघाडी घेतली व त्यानंतरही बांगलादेश संघाला दुसऱ्या डावात झटपट गुंडाळत भारताचे दुसऱ्या डावात पुन्हा आक्रमक खेळत सात विकेटने बांगलादेशला पराभूत करत मालिका व सामनाही जिंकला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी सामना जिंकण्याचा निर्धार, गोलदांज व फलंदाजांच्या परिश्रमाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाल्यावर अशक्यही शक्य करून दाखवता येते, हे भारतीय संघाने बांगलादेशविरोधातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात जगाला दाखवून दिले.

भारतीय क्रिकेट संघ आज कागदावर बळकट असला तरी पूर्वी ते चित्र नव्हते; परंतु सुरुवातीच्या काळात वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या संघाच्या तुलनेत भारतीय क्रिकेट संघ प्रभावशाली नसला तरी त्या त्या काळातील भारतीय क्रिकेट संघाने व त्यातील खेळाडूंनी जगाला आपली दखल घेणे भाग पाडले होते. १९७५, १९७९चा एकदिवसीय विश्वचषक संघ विजेत्या वेस्ट इंडिजला त्या काळात थोपविणे अशक्यप्राय होते. फलंदाज व गोलंदाज याबाबतील वेस्ट इंडिज त्या काळात मातब्बर संघ होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा तोफखाना मैदानावर नुसता आग ओकणारा होता. अशा वेस्ट इंडिजला आसमान दाखवित भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेमधील विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. जे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला जमले नव्हते, ते भारतीय संघाने १९८३ साली विश्वचषक स्पर्धेत करून दाखवले होते. टी-२० विश्वचषक असो किंवा वन डे सामन्यांचा विश्वचषक असो. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा जागतिक कसोटी विजेतेपद असो. भारतीय संघाला गेल्या ११ वर्षांत सर्वोच्च यशाची चव चाखता आलेली नाही. भारताने ४१ वर्षांपूर्वी प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेवर नाव कोरले होते. तब्बल दोन दशकानंतर भारतीय संघाला आयसीसीचे जेतेपद मिळाले होते.

२००२ मध्ये श्रीलंकेसोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. पावसामुळे चॅम्पियन चषकाच्या फायनलमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे हा सामना अनिर्णित सोडण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघाला संयुक्त जेतेपद देण्यात आले. त्यानंतर ५ वर्षांनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला. अशा प्रकारे टीम इंडियाने तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली. २०११ मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारत संघाने श्रीलंकेचा पराभव करत चषकावर नाव कोरले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीवर भारताने नाव कोरले. त्यावेळीही संघाची धुरा एमएस धोनीच्या खांद्यावर होती. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले आहे. भारताकडे दोन वनडे वर्ल्डकप, एक वेळा टी-२० वर्ल्डकप आणि दोन वेळा चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलेे. २०१३ नंतर भारतीय संघाला आयसीसी चषकावर नाव कोरता आलेले नाही.

२०१९-२०२१ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही कसोटी क्रिकेटच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची उद्घाटन आवृत्ती होती. त्याची सुरुवात १ ऑगस्ट २०१९ रोजी ॲॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीने झाली आणि जून २०२१मध्ये रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे अंतिम सामन्यासह समाप्त झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१० मध्ये प्रथम जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या कल्पनेला मान्यता दिल्यानंतर २०१३ आणि २०१७ मध्ये उद्घाटन स्पर्धा आयोजित करण्याच्या दोन रद्द केलेल्या प्रयत्नांनंतर जवळजवळ एक दशक आले. नोव्हेंबर २०२० मध्ये, आयसीसीने घोषित केले की अंतिम स्पर्धक मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार ठरवले जातील. या चॅम्पियनशिपमधील काही कसोटी मालिका या २०१९ च्या ॲॅशेस मालिकेसारख्या दीर्घकाळ सुरू असलेल्या मालिकेचा भाग होत्या. तसेच, या नऊ संघांपैकी काही या कालावधीत अतिरिक्त कसोटी सामने खेळतील, जे या चॅम्पियनशिपचा भाग नव्हते. २०१८-२३ च्या आयसीसी फ्यूचर टूर्स कार्यक्रमाचा भाग म्हणून, मुख्यतः तीन कसोटी खेळणाऱ्या संघांना खेळ देण्यासाठी ही स्पर्धा होती.

२९ जुलै २०१९ रोजी, आयसीसीने अधिकृतपणे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप लाँच केली. २ फेब्रुवारी २०२१ रोजी, कोविड-१९ महामारीमुळे, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्यांची परदेशी मालिका पुढे ढकलली, परिणामी न्यूझीलंडला अंतिम फेरीत जाण्याची हमी मिळाली. ६ मार्च २०२१ रोजी, भारताने घरच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ३-१ ने पराभूत करून अंतिम फेरीसाठी आपला प्रवेश निश्चित केला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने २००० आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचे दुसरे जागतिक क्रिकेट विजेतेपद मिळवून आठ गडी राखून विजय मिळवला.

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी टी-२०च्या फॉरमॅटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. आता रोहितचे वय पाहता तोही फार दिवस क्रिकेट खेळेल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून रोहितला भेट देण्याचा भारतीय खेळाडूंचा मानस असणार. दुसऱ्या क्रमाकांवर भारत असला तरी भारताला अजून काही सामने खेळायचे आहेत. ते जिंकून भारतीय संघ कसोटी क्रिकेटमधील आपल्या विजयाची दावेदारी मजबूत करण्याची शक्यता आहे. भारतीय क्रीडाप्रेमीदेखील या कसोटी चॅम्पियनशिपची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. भारतीय संघाला या जबाबदारीची नक्कीच जाणीव असणार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -