मुंबई : मुंबईतील भुयारी मेट्रोने प्रवास करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. बहुप्रतिक्षित असणारी भुयारी मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (‘एमएमआरसी’) जाहीर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी ४ ऑक्टोबरचा मुहूर्त धरण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता ५ ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑक्टोबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी ठाण्यात विविध विकास कार्यक्रमांचे लोकार्पण, भूमिपूजन करणार आहेत. तर वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करून भुयारी मेट्रोने प्रवास करतील, असे सांगण्यात आले आहे. याचवेळी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (‘एमएमआरसी’) पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्याची शक्यता आहे. ‘एमएमआरसी’च्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या टप्प्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने पंतप्रधान मुंबई – ठाणे दौऱ्यावर असताना ५ ऑक्टोबर रोजी भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३ मार्गिका’ संपूर्णतः भुयारी असून या मार्गिकेची लांबी ३३.५ किमी आहे. तर या मार्गिकेचा खर्च ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा १२.५ किमी लांबीचा असून या टप्प्यात दहा मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर मुंबईकरांना आरे – बीकेसी अंतर केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे. आरे – बीकेसी दरम्यानच्या प्रवासासाठी १० ते ५० रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
या टप्प्यासाठी सध्या ‘एमएमआरसीएल’कडे १३ मेट्रो गाड्या सज्ज आहेत. मात्र १३ पैकी आरे – बीकेसीदरम्यान केवळ ९ मेट्रो गाड्या धावणार आहेत. दिवसाला भुयारी मेट्रो मार्गिकेवर मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक साडेसहा मिनिटांनी एक मेट्रो गाडी सुटणार आहे. वाहनचालक मुक्त अशा या अत्याधुनिक मेट्रो गाड्या असल्या तरी मेट्रो गाड्यांमध्ये मेट्रो पायलट अर्थात मेट्रो चालक उपस्थित असणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यासाठी ४८ मेट्रो पायलटची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १० महिला मेट्रो पायलटचा समावेश आहे.
तसेच गेल्या १०० वर्षांतील पावसाचा अभ्यास करून मेट्रो-३ भुयारी बांधण्यात आला आहे. अभ्यासानुसार पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असूनही मेट्रोपर्यंत पाणी पोहोचणार नाही. मेट्रो-३ कॉरिडॉर शहरातील अनेक महत्त्वाच्या संकुलांजवळून जाणार आहे. एकदा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर, सुमारे ६.३० लाख वाहने रस्त्यावरून कमी होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो-१ आणि मेट्रो-७च्या जोडणीमुळे इतर मेट्रो मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही सुकर होणार आहे.
मेट्रो-३ मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. अशा स्थितीत मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी मेट्रो स्थानकाजवळ बेस्ट बस आणि ऑटो टॅक्सी स्टँड तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच प्रत्येक स्थानकावर बससेवा देण्यासाठी बेस्टशी चर्चा सुरू आहे.
भुयारी मेट्रोचे वेळापत्रक कसे असेल?
आरे-बीकेसी या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दर ६.४ मिनिटांनी गाडी सोडली जाईल. या मार्गावर एकूण ९ मेट्रो ट्रेन असतील. त्या माध्यमातून प्रत्येक दिवशी ९६ फेऱ्या चालवल्या जातील. भविष्यात या मेट्रो मार्गावरुन प्रत्येक दिवशी १३ लाख मुंबईकर प्रवासी करतील. यामुळे लोकल रेल्वे सेवेवरचा ताण कमी होईल. लोकल ट्रेनचे १५ टक्के प्रवासी नव्या मेट्रो सेवेकडे वळतील. याशिवाय, रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल, असे मत एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.
आरे ते बीकेसी मेट्रो मार्गावरील स्थानकांची नावे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेस मेट्रो
मुंबई सेंट्रल
विज्ञान केंद्र
शीतला देवी मंदिर
वांद्रे कॅालनी
सांताक्रुझ मेट्रो
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-१
सहार रोड
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२
एमआयडीसी अंधेरी
आरे जेव्हीएलआर
मेट्रो ३ कार्यालयीन कामगारांना कसा फायदा होईल
मेट्रो ३ चे काम पूर्ण झाल्यावर हिरे उद्योगाला फायदा होईल कारण बीकेसीमध्ये भारत डायमंड बोर्स कंपनी आहे. सीप्झ येथील दागिन्यांचे उत्पादन केंद्राशी जोडते. वर्षानुवर्षे असलेल्या बांधकामामुळे सीप्झ येथील शीप्ट कामगारांवर वाहतूक कोंडीचा परिणाम झाला आहे. त्यांना नॉनपीक अवर्समध्ये ४५ मि. आणि गर्दीच्या वेळेत जवळपास एक दीड तास प्रवास पूर्ण करण्यास लागतो. मेट्रोमुळे त्यांचा प्रवास वेळ अर्ध्या तासापेशा कमी होईल. हे आश्चर्यकारक आहे की, मेट्रो ३ मार्गाने दोन बिझनेस हब्समध्ये थेट कनेक्शन प्रदान करून बीकेसी हिरे मार्केटमध्ये काम करणाऱ्या सामान्य लोकांना फायदा होईल, जे सीप्झला पुरवठा करतात. – अभिजित पंडित, सीप्झमधील डायमंड फर्ममधील अकाउंटट