अटकेनंतर अवघ्या ७२ तासातच झाली मुक्तता
मुंबई : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी फरार असलेल्या शाळेच्या ट्रस्टींना अद्यापही अटक न झाल्यावरुन पोलीस व राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर, पोलिसांनी दोन दिवसांतच शाळेच्या ट्रस्टींना अटक करुन न्यायालयात हजर केले. मात्र, दोनच दिवसांत न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारी एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. मात्र, पोलिसांकडून दुसऱ्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी दुसऱ्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मंजुर केल्यामुळे दोघांचीही सुटका झाली आहे. यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवलेंनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल्यानंतर पोलिसांनी बुधवारी शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती. मात्र, शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार व अक्षय शिंदे प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका झाली आहे. त्यांसह, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील २५ हजारांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, याप्रकरणी तिन्ही आरोपींची कायदेशीर सुटका झाली आहे. याप्रकरणी दाखल दोन्ही गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सेम सेक्शन असल्याने जास्त युक्तिवाद न करता, कालच्या जामीनाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाकडून शुक्रवारी दोघांनाही जामीन मिळाला आहे.
पीडित मुलीचे कुटूंब उच्च न्यायालयात जाणार
बदलापूर अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीला जामीन मिळाल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती दिली.