जव्हार(मनोज कामडी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जव्हार तालुक्यातील ग्रामदान मंडळ जामसर व पिरामल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पंचायतींराज विभागाच्या निर्देशांनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. पंचायतीराज विभागाच्या निर्देशांनुसार आयोजित विशेष ग्रामसभेत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विशेष निमंत्रित करून त्याचा संविधान उद्देशिका व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे आतापर्यंतचे अनुभव सांगण्याची विशेष संधी देण्यात आली.
सदर कार्यक्रमाची सुरवात ग्रामदान मंडळ अध्यक्ष विठठल थेतले ,उपाध्यक्ष हर्षद राऊत,जिल्हा परिषद सदस्या सुरेखा थेतले, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर उमतोल, ग्रामपंचायत अधिकारी सुनील भोये, व पिरामल फाऊंडेशनच्या कार्यक्रम प्रमुख वंदना मौर्य, पंचायत समिती सदस्य, व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक ,आदिवासी सेवक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महात्मा गांधीजीं आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विशेष ग्रामसभेचे उद्दिष्टे व महत्व यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
ग्रामविकास योजनाच्या निर्मितीत ग्रामस्थांची भूमिका या विषयावर गांधी फेलो सिम्पी, पृथ्वी, रुक्सार, अमन, सुरेश आणि करुणा फेलो वैशाली आणि छाया यांनी संयुक्तपणे गाव विकास आराखडा तयार करण्यात गावकऱ्यांच्या भूमिकेवर आपले विचार मांडले.पण शाळांमध्ये पुरेसे शिक्षक, हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर्स आणि रस्त्यांवर वाहतुकीची सुरळीत व्यवस्था असेल, तर खूप सोयीचे होईल.असे मत मांडले.
यावेळी सभेतील उपस्थितांनी नशामुक्त गाव व स्वच्छतेची शपथ घेतली.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माझ्या आईच्या नावाने एक झाड अभियानाअंतर्गत फळझाडे लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सुनील भोये यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका , जेएसडब्ल्यू स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.