
मुंबई: आजपासून टी-२० वर्ल्डकप २०२४ला सुरूवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामन्यांची मजा घेता येणार आहे. दुबई आणि शारजामध्ये खेळवल्या जाणाऱ्या महिला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आज पहिल्या दिवशी दोन सामने असतील. स्पर्धेचा पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंडच्या महिला संघादरम्यान असेल तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघादरम्यान रंगेल.
बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता शारजा येथे सुरू होईल तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला रविवारी पाहायला मिळेल. न्यूझीलंडविरुद्ध हा सामना रंगत आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २० ऑक्टोबरला रविवारी खेळवला जाईल. १८ दिवसांमध्ये एकूण २३ सामने रंगतील. आधी ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र तेथील परिस्थिती पाहता आयसीसीने ही स्पर्धा यूएईमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.
स्पर्धेत १० संघ भाग घेत आहेत. त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप एमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका आहे.तर ग्रुप बीमध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ आहेत.