ऋतुराज – ऋतुजा केळकर
“आस्तिक आस्तिक मृत्यूंजय
काळभैरव उदंड पाणी
सर्व वाईट गोष्टींना
आस्तिक ऋषींची शपथ”
लहानपणापासून रोज रात्री हा मंत्र म्हणून झोपायची मला सवय. पण त्यामागचे कारण कधीच कळायचे नाही, पण आस्तिक ऋषींची शपथ घातली आहे म्हणजे माझ्यापर्यंत कुठलीही वाईट गोष्ट पोहोचणार नाही असा गाढ विश्वास मात्र मनात बाळगून मी निर्धास्तपणे झोपी जायचे.
काळ बदलला आणि जसजशी मी मोठी होत गेले तसतसे मला हे जाणवत गेले की, शपथ बिपथ घालून काहीही होत नाही. आयुष्यात येणाऱ्या वाईट गोष्टींना आपले आपल्यालाच धैर्याने सामोरेे जावे लागते आणि मग अशाच एका आयुष्याच्या वळणावर ‘ती’ भेटली. जीवनाच्या प्रवासात अनेकानेक व्यक्ती वळणावळणावर भेटत गेल्या. कुणी साथ दिली तर कुणी अर्ध्यावर साथ सोडली. पण ती मात्र श्वासासारखी सोबत राहिली, नकळतच माझी कायमची जीवलग सखी झाली. नेत्रात शितलता पण हातात शस्त्रे, वाघावर बसून जगाला तारणारी ‘आई जगदंबा’.
जाणवली माझ्यातील ‘ती’ स्वतःच्या पायावर सज्जडपणे उभे राहताना.काळाच्या वावटळीत संकट अंगावर घेऊन स्वतःचं वावटळे बनून लढताना. क्षुद्र मोहात न गुरफटता कर्तव्याची कावड खांद्यावर घेऊन संसाराचा गाडा ओढताना. नकळतच कधी तिच्या नजरेतील माया ओठांवर आली शब्दांत साखर बनून, तर कधी आली हातांतील शस्त्रांनी आयुष्याचं सुगंधित टवटवीत फुलं न कोमेजण्याकरिता समोरच्या वासनांनी बरबटलेल्या पुरुषांच्या नजरा काढून हातात दिल्या. कधी मुलगी बनून तर कधी माता बनून प्रत्येक वळणावर भेटणाऱ्या या जगदंबेचा ‘नवरात्र’ हा उत्सव संपूर्ण भारतभर युगानुयुगे साजरा होतो.
स्त्रीचे जीवन हे सामाजिक घटनांची गुंफण आहे. ऋतुऋतुतं फुलणारी भारतीय स्त्री जीवनाची पानगळ हसत-हसत झेलत जगण्याच्या आनंदातून मी तुपणाच्या शिंपल्यातून सोशिकतेने चैतन्याचे मोती पुरुषाच्या आयुष्यात गुंफते. म्हणूनच पुरुषांनीही जगण्याच्या या सुंदर लयीला आत्मसाद करून चैतन्याच्या नवनवीन खुणांनी सुखाच्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंग स्त्रियांच्या ओच्यात घालून त्यांच्या आयुष्यात चंद्राची शीतलता प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे. पुरुषांनी यशाच्या आकाशात भरारी घेताना सोबत जमिनीवर राहून तुमच्याकरिता झिजण्यात समाधान मानून सुखावणाऱ्या, तुम्हाला झेपावण्याकरिता तुमच्या पंखात बळ निर्माण करणाऱ्या स्त्रियांना सदैव सोबत घेतले पाहिजे. जगण्याची गुढता कितीही गुढ असली तरीही प्रतिभेचे आणि कर्तृत्वाचे सूर हे मातेच्या उदरातच उमटतात आणि त्याच सुरावटींचा वेध नवरात्रोत्सवासारख्या भारतीय सणांद्वारे आसमंतात प्रत्येकाच्या मनात नव्हे तर आयुष्यात गुंजत राहतात.
उन्मुक्त अनुभूतींसाठी जगण्याची ओढ असणे हे स्वाभाविकच आहे पण आजही या समाजात स्त्रियांना फक्त एक उपभोग्य वस्तू मानून तिला जगण्यासाठी धडपडावे लागते. शरीर जगवण्याकरिता शरीराचाच सौदा करावा लागतो. मग असे हे जगणे नक्कीच व्यर्थ आहे असे नाही का वाटतं?
जेव्हा स्त्रियांविषयीचा हळवेपणा, वात्सल्य, सच्चेपणा हा समाजाच्या सर्व स्तरांवर डोकावेल, कायम रोमारोमात, श्वासोछ्वासात, शब्दाशब्दांत किंबहुना साऱ्याच जीवनात स्नेहशिलता समाजाच्या तळागाळापर्यंत रूजेल तेव्हाच खऱ्याअर्थाने ‘नवरात्र’ साजरी होईल.
नाहीतर गीता, कुराण आणि बायबलमध्ये जीवनाची जी मूल्ये सांगीतली आहेत ती केवळ पुस्तकी ज्ञानच राहतील. जर असे झाले तर माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर,
‘व्यर्थ आहेत वल्गना स्त्री मुक्तीच्या…
जोपर्यंत गर्भाशय आहे…
स्त्रीच्याच उदरात…
वहावा लागतो गर्भभार नऊमास…
आणि द्याव्या लागतात जिवघेण्या कळा…
आपल्याच रक्तामांसातून पोसलेल्या गोळ्याला…
पहिला मोकळा श्वास मिळण्याआधी खोटी आहे समानता…
जोपर्यंत जन्मदाता होऊ शकतो नामानिराळा…
त्याच्या लेखी तर
घटकेचा सोहळा
इंद्रीयसुखाचा …
इंद्रीयसुखाचा…