आज न्यायालयासमोर करणार हजर
मुंबई : ऑगस्ट महिन्यात बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur Crime) झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. काही दिवसांपूर्वी याप्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला. अशातच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच दोघेही आरोपी महिनाभरापासून फरार झाले होते. आता या दोघांना पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या दोघांना आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.
नेमके प्रकरण काय?
बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर हे दोन्ही पदाधिकारी फरार झाल्यामुळे संतप्त नागरिकांकडून प्रशासनावर टीका केली जात होती. अखेर पोलिसांनी या फरार पदाधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे.