Sunday, December 7, 2025

रामनामाचे महात्म्य!

रामनामाचे महात्म्य!

समर्थ कृपा - विलास खानोलकर

बाळकृष्णबुवा तळवलकर हे रामदासी एकदा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. तेव्हा श्री स्वामी त्यास म्हणाले, ‘रामनामाचे महात्म्य जपून करा बरे.’ ‘साखरेत पाणी मिसळू नका बरे.’ त्यावेळी काही लोक, त्यांच्या उपास्य दैवताची प्रतिमा, गीता, सप्तशती इ. जे त्यांना वाचायचे अगर पूजावयाचे असेल ते प्रथम श्री स्वामी महाराजांच्या हाती देऊन त्यांच्या हातून प्रसाद म्हणून घेत. नंतरच पूजनास अगर वाचनास आरंभ करीत. श्री स्वामी महाराजही पोथी अथवा प्रतिमेस हात लावून परत करीत.

अर्थ - श्री समर्थांकडे - दर्शनास आलेल्या बाळकृष्णबुवा तळवलकर रामदासी यांस ते सांगतात, ‘रामनामाचे महात्म्य जपून खा बरे.’ याचा संक्षेपाने मथितार्थ असा आहे. रामनाम म्हणजे देवाचे नाव प्रेमाने, उत्साहाने, एकाग्र चित्ताने विषयवासना विरहित स्थितीत शुद्ध मनाने घ्यावे. म्हणजे रामाचे देवाचे स्वरूप कळू लागेल. सर्व प्राणिमात्रांत राम म्हणजे आत्माराम आहे असे समजून सर्वांप्रति समरसता व प्रेमभाव ठेवून आचार-विचार आणि व्यवहार करावा. जसे वर्तन तसाच विचारही असावा.

‘साखरेत पाणी मिसळू नको बरे.’ याचा अर्थ रामनाम खपते आहे, लोकांना भावते आहे, पण म्हणून सवंग लोकप्रियतेच्या मागे लागू नये. लोकेषणा म्हणजे प्रसिद्धी, वित्तेषणा म्हणजे पैशाची हाव या दोन्ही गोष्टी अध्यात्म- परमार्थ यात वर्ज्य आहेत, हे लक्षात ठेवावे. थोडक्यात श्री स्वामींना हेच सांगावयाचे आहे की, देवाचे नाव घेऊन दुकानदारी करू नका. खोटी प्रतिष्ठा, दांभिकपणाच्या मागे लागू नका. आजकाल चमचेगिरी, चमकोगिरी, दिखाऊपणा यांचे पेव फुटले आहे. प्रवचनात करमणूकप्रधानता सांगण्याची वा कथन करण्याची हातोटी, नाट्यमयता, साथीला विविध वाद्यांचे संगीत आदी साग्रसंगीत सामग्रीमुळे प्रवचन-सत्संग-कीर्तने यास यात्रा वा उरुसासारखी गर्दी जमते. कार्यक्रम झकास होतो. बाकी... सर्वच उथळपणा. बोध-शोध आणि आत्मसुधारणेचा मात्र अभाव असतो. श्री स्वामींनी याबाबत सर्वांनाच सजग केले. आपण सजग झालो, तरच यातील अर्थबोधालाही अर्थ असतो.

रामनाम स्वामीनाम चालिसा

स्वामी म्हणे दिनरात म्हणा राम मनात जनात कामात ठेवा राम ।।१।।

रक्ताच्या थेंबाथेंबात राहतो राम तुमच्यासाठी राम जेव्हा म्हणेल राम ।।२।।

स्वामी नाम प्रचंड सशक्त रामासारखे व्हा तुम्ही पितृभक्त ।।३।।

रामासारखे व्हा तुम्ही मातृभक्त रामासारखे व्हा तुम्ही गुरुभक्त ।।४।।

रामासारखे व्हा तुम्ही स्वामीभक्त रामश्याम दत्तभक्त मातृभक्त ।।५।।

स्वामीभक्त रामाचे पाळा नियम पाळा एक वचनी एक बाणी नियम ।।६।।

एक पत्नी, एक व्रती उत्तम नियम बंधुप्रेम, देशप्रेम, प्राणी प्रेम नियम ।।७।।

निसर्गप्रेम नदिनाली प्रेम नियम प्रेमवचन, पितृवचन सत्य नियम ।।८।।

साऱ्या जगात पाना पाण्यात राम रानावनात फुलाफळात सुगंधी राम ।।९।।

चांगल्या कार्यात हसण्याबोलण्यात राम लंकादहनात रावणा मारणात राम ।।१०।।

लक्ष्मण भरत शत्रुघ्न सारे राम सुग्रीव अंगद जांभुवत, हनुमान सारे राम ।।११।।

नर, वानर, जटायु, खार सारे राम सुवर्ण हरीण, विभीषण एकक्षण राम ।।१२।।

तात्काळ पूर्ण करा चांगले काम स्वच्छ ठेवा नदी-नाले देवधाम ।।१३।।

गंगा यमुना, जमुना, सीता, देवीधाम भरपूर फुले फळे झाडे लावा काम ।।१४।। सर्व पृथ्वीच जगवणे रामाचे काम अणुयुध्द टाळणे मानवजात वाचवणे काम ।।१५।।

अणुरेणुत दत्त, स्वामी एक नाम दुःखे गोपाळ बुवांची दूर केली घेता स्वामी नाम ।।१६।।

गोपाळ केळकरांच्या बखरीत स्वामी नाम दिनरात तुम्ही घ्या राम स्वामी नाम ।।१७।।

राम जन्मभूमी दिनाला पूर्ण केले रामनाम जेथे स्वामीनाम तेथे राम नाम ।।१८।।

अयोध्या सजली घेऊन रामनाम अयोध्या स्वागत करी घेऊन रामनाम || १९ ||

सारा भारत देश सजला घेऊन रामनाम राम आले मंदिरी घ्या रामनाम || २० ||

vilaskhanolkarkardo@gmail.com

Comments
Add Comment