Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा

मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा

दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १३ कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती

मुंबई : मराठी भाषेला मोठा इतिहास आहे, तब्बल २ हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष माय मराठी देते, म्हणूनच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या १० वर्षांपासूनचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी २०१३ सालापासून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी, त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. आता, केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने १३ कोटी मराठीजनांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरलीआहे. मराठी भाषेचा विकास, ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. आता आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके….’ असे मराठी भाषेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. असे असले तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावी, अशी मागणी कोट्यवधी मराठी बांधवांकडून व राजकीय नेत्यांकडून करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे.

मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत. भारत सरकारने 12 ऑक्टोबर 2004 रोजी अभिजात भाषा म्हणून भाषांची एक नवीन श्रेणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अंतर्गत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी खाली नमूद निकष निश्चित केले आणि याच निकषांवर तमिळ या भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केले होते.

अभिजात दर्जा मिळवणारी मराठी भाषा सातवी

सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील ७ वी भाषा ठरली आहे. सन २००४ मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. तामिळनंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू, २०१३ मध्ये मल्याळम, २०१४ मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. आता, विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

आज ऐतिहासिक दिवस : देवेंद्र फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण करत मोदी सरकारने महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! – नारायण राणे – खासदार , रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

सर्वांचेच मनपूर्वक आभार : एकनाथ शिंदे

केंद्र सरकारच्या निर्णयार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “माझा मराठाची बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!” अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.

मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल – अजित पवार

“मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाचे मी मनापासून आभार मानतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी गेली अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठीभाषकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -