Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यगोमाता ही राज्यमाता स्वागतार्ह निर्णय...

गोमाता ही राज्यमाता स्वागतार्ह निर्णय…

गाईला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार हिंदुत्वाच्या रक्षणाचे काम करत आहे हे यातून जाहीरपणे दिसून आले. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गाईला राज्यमाता म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे आता दुसरे राज्य ठरले आहे. याआधी गाईचा सन्मान करत राज्यमाता म्हणून घोषणा करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य होते. उत्तराखंड विधानसभेने १९ सप्टेंबर २०१८ रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला होता. हा मंजूर ठराव एकमताने केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. आता अशाच पद्धतीने महाराष्ट्र सरकारनेही गाईला राज्यमाता म्हणून घोषित करून, शिवरायाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीचा लौकिक वाढविला आहे.

हिंदू धर्मात गाईला अनन्यस्थान आहे. तिला मातेचा दर्जा देण्यात आला असून धार्मिक विधींमध्ये तिची पूजा केली जाते. गोमूत्र आणि शेण पवित्र मानले जाते. तसेच विविध धार्मिक समारंभात ते वापरले जाते. गाईचे दूध केवळ शारीरिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच भारतात गाईचा नेहमीच आदर केला जातो. वैदिक काळापासून आजपर्यंत गाईकडे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिले जात असून, तिच्यामध्ये देवी-देवता वास असतो, असा मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणूनच गाईला मातेचा दर्जाही देण्यात आला आहे. सेंद्रिय शेतीमध्येही गाय महत्त्वाची मानली जाते. तिच्या गोमूत्राचा वापर शेतीमध्ये केला जातो, जो पिकांसाठी फायदेशीर ठरतो. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि पंचगव्य उपचारात गाईचे योगदान अमूल्य आहे. गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही यांचा समावेश असलेली पंचगव्य पद्धत विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे गाईचे महत्त्व ओळखून महायुती सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल.

अयोध्येतील राजा प्रभू रामचंद्राचे पूर्वज राजा दिलीप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोसेवा केल्याची पौराणिक कथा आणि इतिहासात दाखले सापडतात. राजा दिलीपने गोसेवा केल्याचे सुंदर वर्णन ‘रघुवंश’ या काव्यात कालिदासांनी केले आहे. प्राचीन भारतीय साहित्यात ‘गोपालन’ आणि ‘गोसेवा’ हा मोठा महत्त्वाचा विषय मानला जात असे. गाय हा हिंदू जीवनाचा अविभाज्य भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी गाईला कापणाऱ्या कसायाचा हात तोडून टाकला होता. छत्रपती झाल्यावर शिवाजी महाराजांनी ‘गोब्राह्मण प्रतिपालक’, असे बिरुद स्वतःला लावून घेतले, असा संदर्भ वाचनात आलेला आहे. त्याच कारणाने गाईकडे उपयुक्त पशू या भावनेने पाहण्यापेक्षा ‘गोमाता’ म्हणून आपले राष्ट्रीय वैशिष्ट्य या दृष्टीने पाहिले पाहिजे, हे नमूद करावेसे वाटते.

गाईचे पावित्र्य, हिंदू धर्मात असल्याने ती दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे, अशी बहुसंख्या हिंदूंची श्रद्धा आहे आणि म्हणून तिचे संरक्षण आणि पूजन केले पाहिजे. गाय ही विविध देवतांशी देखील जोडली गेली आहे, विशेषत: शिव (ज्याचा घोडा नंदी, एक बैल आहे), इंद्र (कामधेनूशी जवळचा संबंध आहे, इच्छा देणारी गाय), कृष्ण (त्याच्या तारुण्यात एक गोरक्षक) अशा धार्मिक कथाही आपल्याला ऐकायला मिळतात.

सजीव प्राण्यांना हानी पोहोचवण्याची इच्छा नसणारी, गाय ही अहिंसक उदारतेच्या जीवनाचे प्रतीक बनली आहे. या व्यतिरिक्त, तिच्या उत्पादनांनी पोषण पुरवले म्हणून, गाय मातृत्व आणि माता पृथ्वीशी संबंधित होती. गाईला देवतेच्या भावनेतून हिंदू धर्मीय पाहत असताना, तिच्याकडे पशू म्हणून तिची कत्तल करणारा समाज डोके वर काढत होता. त्यातून विशेषत: उत्तर भारतात, गाईंच्या रक्षणासाठी एक चळवळ उभी राहिली. गोहत्येवर बंदी घालावी अशी मागणी विविध राज्यातून होऊ लागली होती. २०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यामुळे गोरक्षण चळवळीला मोठी बळकटी मिळाली. गोहत्या करणाऱ्या नराधमांच्या मुसक्या आवळल्या जाऊ लागल्या, हे सत्य लपून राहिलेले नाही. महाराष्ट्रात गो हत्या प्रतिबंधक कायदा २०१५ साली मंजूर झाला. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त गाई-वासरे नव्हे तर बैल, वळू यांच्या हत्येवर त्याचप्रमाणे अशा प्राण्यांचे मांस विकण्यावर तसेच वाहतूक करण्यावर बंदी आणली आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असताना गाय आणि गोवंश यांच्या हत्येच्या बातम्या नियमितपणे ऐकायला येतात. गुजरातमध्ये गिर गाईंची संख्या वाढवण्यासाठी केंद्र शासनाने ब्राझील देशाकडून १ लाख भारतीय वंशाच्या गोवंशाचे वीर्य मागविले होते. भाजपा शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

भारतीय गाय ही मुळातच सात्त्विक आणि शांत असते. तिचे हंबरणे श्रवणीय असते, झोपणे शांतपणे असते. भारतीय वंशाच्या गाईच्या सान्निध्यात राहिल्याने तणाव निघून जातो, याविषयी आता विदेशात संशोधन चालू आहे. भारतात मात्र या अमूल्य कामधेनूंची संख्या झपाट्याने न्यून होत आहे. धर्मांधांच्या लांगूलचालनामुळे गाईंच्या मानेवर फिरणारे सुरे तत्कालीन काँग्रेस सरकारने रोखले नाहीत, हे कटू सत्य मान्य करायला हवे. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना ना साधू सुरक्षित होते ना गाई. पालघरमधील साधूंच्या हत्याकांडामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा जनतेसमोर आला होता. राज्यात अडीच वर्षांच्या काळात गोरक्षकांवर हल्ले थांबले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गोसंवर्धनाबरोबर सन्मान देण्याचा घेतलेल्या या निर्णयाचे अनेक सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे, त्यामुळे भारतीय वंशाच्या गाईंच्या संवर्धनासाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवेत; मात्र गोसंवर्धन करताना गोमातेच्या मानेवर सुरा फिरवणारे हात रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -