Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीगीतेची महती, ज्ञानदेव गाती...

गीतेची महती, ज्ञानदेव गाती…

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

तसे, अगणित जे ब्रह्म ते गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने जर प्रकट झाले नसते, तर कोणालाही जाणता आले असते काय?’ ओवी क्र. १७०४

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील समारोपाच्या भागात आलेली ही ओवी! गीतेचे माहात्म्य सांगणारी. अफाट असणारे ज्ञान श्रीकृष्णमुखाने व्यासमुनींनी गीतेत आणले. ही त्यांची मोठी कामगिरी आणि मानव जातीवर केलेले उपकार होते. व्यासमुनींचे हे कर्तृत्व सांगताना ज्ञानदेव देतात हृदयंगम दृष्टान्त. पाहूया ते…

‘नादु वाद्या न येता। तरी कां गोचरूं होता?।
फुलें न होतां घेपता। आमोदु केविं॥

‘नादब्रह्म जर वाद्यांत आले नसते, तर नाद आपल्याला कसा कळला असता? फुले जर नसती, तर वास कसा घेता आला असता?’ ओवी क्र. १७०१

‘पक्वान्नांत जर गोडी नसती, तर जिभेला कशी प्राप्त झाली असती? आरसा जर नसता तर डोळ्यांना आपले रूप कसे पाहता आले असते?’ ओवी क्र. १७०२

‘निराकार श्रीगुरू जर आकारास आले नसते, तर उपासकांना सेवा कशी करता आली असती? ओवी क्र. १७०३
हे दाखले देऊन ज्ञानदेव म्हणतात, त्याप्रमाणे अगणित ब्रह्म गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने जर प्रकट झाले नसते, तर कोणालाही जाणता आले असते काय?

नादब्रह्म हे विश्व व्यापून टाकणारे आहे, अफाट आहे. पण ते वाद्यांत प्रकटते, त्यामुळे आपल्याला त्या नादब्रह्माला जाणता येते, आनंद घेता येतो. त्याप्रमाणे तत्त्वज्ञान अफाट आणि अनंत आहे, परंतु ते गीतारूपाने आल्याने सगळ्यांना घेता येऊ लागले.

पुढचा दाखला आहे पक्वान्नाचा. पक्वान्नांत गोडवा असतो, तो जिभेला अनुभवता येतो, त्याचा आस्वाद घेता येतो. गीता हे जणू असे पक्वान्न आहे, त्यातील ज्ञानाचा आस्वाद मनाने घ्यावा आणि सगळ्यांनी तृप्त व्हावे. गीतेमधील तत्त्वविचारात आत्मज्ञानाची भूक लागलेल्या भक्तांना भूक भागवण्याची शक्ती आहे, पुन्हा त्यात रसपूर्णता आहे, हे यातून सुचवले आहे.

पुढचा आरशाचा दाखलाही असाच अर्थपूर्ण आहे.
आरशाचा आरसा आपले ‘स्व’रूप दाखवतो, त्याप्रमाणे गीता हा जणू एक आरसा आहे. नेहमीचा आरसा आपले डोळ्यांना दिसणारे रूप दाखवतो, तर गीता डोळ्यांना न दिसणारे रूप दाखवते. आरशात आपल्याला दिसले की काही आपल्यात कमी आहे की ते नीट करण्याचा माणूस प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ‘गीते’तील श्लोक दाखवून देतात की, ‘तू आपल्या शरीराला अवाजवी महत्त्व देतो आहेस. तुझे शरीर म्हणजे तू नाहीस. तू त्या पलीकडे आहेस.’ त्यामुळे माणूस ज्ञानाच्या मार्गावर चालू लागतो.

श्रीगुरू शिष्यांसाठी सगुण होतात. म्हणून शिष्य त्यांची सेवा करू शकतो. तद्वत अमूर्त तत्त्वज्ञान गीतेच्या रूपाने साकार झाले. त्यामुळे सर्वांना त्याचे वाचन, पठण, मनन करणे शक्य झाले. म्हणजे गीता ही श्रीगुरूंप्रमाणे आहे.

एकाहून एक मनोवेधक अशा दृष्टान्तांतून ज्ञानदेव काय सांगतात? व्यासमुनींचा मोठेपणा, गीतेची शक्ती. त्याचबरोबर त्यांना त्यातून सुचवायचे आहे की, म्हणून सगळ्यांनी अवश्य गीता, ज्ञानेश्वरी यांचा अभ्यास करावा. जीवन-प्रवास सार्थ करावा. हे केवळ ग्रंथ नव्हेत; ते ग्रंथांच्या पलीकडले गुरू आहेत.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -